Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 September, 2009

राष्ट्रीय ज्युनियरमध्ये भक्तीला अजिंक्यपद

महिला बुद्धिबळ स्पर्धा

पणजी, दि.२७ (क्रीडा प्रतिनिधी) - गोव्याची कसलेली बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवताना चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर महिला बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद एक फेरी बाकी असतानाच जिंकले. भक्तीने आज दहाव्या फेरीत महाराष्ट्राच्या मिताली पाटील( एलो २०४१) हिला पराभूत करत आपली गुणसंख्या ९.५ वर पोचवली. भक्तीने आपल्या जेतेपदाच्या वाटचालीत ऐश्वर्या व शोैकनिक प्रामाणिक( सर्व झारखंड), पी. व्ही नंदिथा, सीएच सरिता, आर प्रीती व पोन कृतिका(२२१५) ( सर्व तामिळनाडू), वुमन्स कॅडेट मास्टर शाल्मली गागरे व मिताली पाटील(महाराष्ट्र), पद्मिनी राऊत(२२३०) (ओरिसा) यांना पाणी पाजले तर आंध्र प्रदेशच्या प्रत्युषा बोड्डा( एलो १९६३) हिच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावण्याची भक्तीची ही दुसरी वेळ असून यापूर्वी २००७ साली नागपूर येथे या स्पर्धेत ती अजिंक्य ठरली होती. उद्या शेवटच्या म्हणजेच ११व्या फेरीत तिचा सामना तामिळनाडूच्या आर. भारती(२१६०) हिच्याशी होणार आहे.
भक्तीच्या या यशाबद्दल गोवा राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशिष केणी, सचिव अरविंद म्हामल, खजिनदार किशोर बांदेकर यांनी अभिनंदन केले आहे. गोव्याच्या अन्य स्पर्धकांत इव्हाना फुर्तादोने दहाव्या फेरीत जेव्ही निवेदिता हिचा पराभव केला. उद्या ती आंध्र प्रदेशच्या जी. लस्या हिच्याशी दोन हात करेल. इव्हानाचे ६ गुण झाले आहेत. पुरुष ज्युनियर गटात वंडर बॉय अनुराग म्हामलने तामिळनाडूच्या पी. लोकेशचा पराभव करत आपली गुणसंख्या ६.५वर पोचविली आहे. उद्या त्याला सुवर्ण कृष्णन याच्याशी झुंज द्यावी लागेल. के तुषाराने पंजाबच्या विनोद कुमारचा पराभव केला तर रोहन अहुजाला कर्नाटकच्या ए. ऑगस्टिनकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे रोहनचे ४ गुण कायम आहेत.

No comments: