Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 September, 2009

दुसऱ्या प्रकरणातही मिकींना जामीन मंजूर

मला तुरुंगात पाठवण्यासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर : मिकी
मडगाव, दि.२६ (प्रतिनिधी) : गोवा पोलिस हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनलेले आहेत. ते पक्षपाती वागत असल्याने त्यांच्यावर आपला अजिबात विश्र्वास नाही. यासाठीच आपल्याला आठवडाभरात दुसऱ्यांदा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली, असा दावा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांचा केंद्रबिंदू ठरलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज येथील जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
माजोर्डा कॅसिनोत २९ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात कोलवा पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यासंदर्भात आपल्याला अटक होण्याची शक्यता गृहीत धरून न्यायालयाकडे सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीसाठी ते न्यायालयात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी पोलिस यंत्रणेवर उपरोक्त ठपका ठेवला.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांनी त्यांचा अर्ज मंजूर करताना पोलिसांनी त्यांना अटक केलीच तर पाच हजारांच्या जामिनावर त्यांना सोडण्यात यावे, असे आदेश दिले. अर्जदाराला यापूर्वीच्या अर्जावर दिलेल्या निवाड्याबरोबरच या निर्देशाचीही कार्यवाही व्हावी, असे न्यायाधीशांनी बजावले आहे.
मिकी पाशेको यांच्यावर कोलवा पोलिसांनी ३५२, ५०६ (२) या कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी त्यांचे साथीदार मॅथ्यू यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक करून नंतर जामिनावर सोडले होते. यानंतर ही प्रकरणे गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवली गेली व ३० व ३१ मे दरम्यानच्या प्रकरणांसंदर्भात याच न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. यानंतर २९ मे रोजीच्या प्रकरणात गोवून आपल्याला अडचणीत आणण्याचा सुगावा लागल्यानंतर मिकी पाशेको यांनी काल सायंकाळी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती.
पर्यटनमंत्री म्हणाले की, कसेही करून आपल्याला तुरुंगात पाठविण्याचा चंग काही मंडळींनी बांधलेला आहे व त्यासाठी पोलिस यंत्रणेचा अवलंब केला जात आहे. यंत्रणा या दबावाला बळी पडताना दिसत आहे. या स्थितीत न्यायालयेच निःपक्षपातीपणे वागताना दिसत आहेत, आपला त्यावर विश्र्वास आहे.
------------------------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांची राज्यपालांशी चर्चा
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज सकाळी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांची भेट घेतली. हे वृत्त राजधानीत पसरताच राजकीय गोटात एकच चर्चा सुरू झाली. ही भेट मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळातून वगळण्याबाबत असावी, असा तर्क काहींनी काढला होता. यासंदर्भात काही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. मंत्रिमंडळात फेरबदलाची अजिबात शक्यता नाही, असेही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले. ही भेट नियमित असल्याचे सांगून त्यांनी या चर्चेतील हवाच काढून घेतली.
दरम्यान, गेल्यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी राज्यपालांची भेट घेतली व लगेच मिकी पाशेको यांच्यावर पोलिस तक्रार नोंद करण्यात आली होती त्यामुळे यावेळीही तसाच काही प्रकार तर नसेल, असा लोकांचा अंदाज होता. मिकी पाशेको यांनी मुख्यमंत्र्यांवर उघडपणे शरसंधान सुरू केल्याने त्याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी मौनव्रत धारण केले.

No comments: