Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 September, 2009

पीपल्सच्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

सर्व शैक्षणिक संस्थांमधील जागृती कार्यक्रम पूर्णत्वाकडे
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): येथील पीपल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्यानंतर आरोग्य खात्याने आपली कंबर कसली आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांत स्वाईन फ्लूबाबत जागृती करण्याचा कार्यक्रम जोरात सुरू ठेवला असून तो पूर्णत्वाकडे पोहोचल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. ज्यो डिसा यांनी दिली. पीपल्सच विद्यार्थी पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात एकीकडे स्वाईन फ्लू नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य खात्याकडून केला जात असतानाच पीपल्स हायस्कुलात अचानक काही विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याने आरोग्य खात्याची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, या हायस्कूलला सात दिवसांची सुट्टी जाहीर झाली असली तरी एखाद्या विद्यार्थ्यांत स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात तात्काळ संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. डिसा यांनी केले. स्वाईन फ्लूची बाधा हायस्कुलातील विद्यार्थ्यांना झाली हे जरी खरे असले तरी ही काळजी प्रत्येक पालकांनी घेण्याची गरज आहे. पुणे व मुंबई येथे या साथीचा जोर सुरू आहे व त्यामुळे याठिकाणी जाणे अधिकतर टाळणेच योग्य ठरणार आहे. स्वाईन फ्लूमुळे घाबरून जाण्याचेही काहीही कारण नाही. योग्य वेळी तपासणी केल्यास त्यावर उपचार आहेत व रुग्ण पूर्णपणे बराही होऊ शकतो, अशी माहितीही डॉ.डिसा यांनी दिली. ही साथ असल्याने ती पसरू न देता नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे व त्यामुळेच उपाययोजना आखणे हे आरोग्य खात्याचे कर्तव्य ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पीपल्स प्रकरणामुळे काही पालकांत विनाकारण भीती पसरल्याच्या वृत्ताबाबत बोलताना त्यांनी कोणतीच चिंता करण्याची गरज नाही व विनाकारण गैरसमजुतीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये,असे आवाहन केले. स्वाईन फ्लूबाबत माहिती हवी असल्यास आरोग्य संचालनालयाशी संपर्क साधावा व तेथून या साथीबाबत माहिती मिळवावी असेही त्यांनी शेवटी सांगितले.

No comments: