Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 28 September, 2009

..अन्यथा मनोरंजन संस्थेचा "इफ्फी' वेळी पर्दाफाश करू

दामोदर नाईक यांचा इशारा

मडगाव दि. २७ (प्रतिनिधी) : चित्रपटांशी संबंधित सर्व कामांबाबत नोडल एजन्सी असलेली गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) प्रत्यक्षात स्थानिक उगवत्या चित्रपट निर्मात्यांना सतावत असल्याचा गंभीर आरोप आमदार व चित्रपटनिर्माते दामोदर नाईक यांनी केला व या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी व ताबडतोब सर्व चित्रपट निर्मात्यांची एक बैठक बोलवावी व त्यांच्या खितपत पडून असलेल्या मागण्या जाणून घ्याव्यात अन्यथा आगामी "इफ्फी'त सोसायटीचा "हिडन अजेंडा' उघडा करण्याखेरीज दुसरा पर्याय रहाणार नाही, असा इशारा दिला आहे.
हल्लीच दामबाबाले घेाडे नावाची संस्था स्थापन करून तिच्या झेंड्याखाली"जागोर' नामक कोकणी चित्रपटाचे काम सुरु केलेल्या नाईक यांनी या प्रकारांना वेळीच आळा घातला गेला नाही तर गोव्यातील चित्रपट संस्कृतीची त्यातून पीछेहाट होईल, असा इशाराही एका पत्रकातून दिला आहे.
आज येथे जारी केलेल्या या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की मनोरंजन संस्थेने हल्लीच आपणाला एक पत्र पाठवून गोव्यात विविध भागांत २५ दिवस चित्रिकरणासाठी दिवसाला ६ हजार या प्रमाणात एकूण दीड लाख रु. भरणा करण्यास कळविले आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्थानिक चित्रपट निर्मात्यांना गोव्यात चित्रिकरणासाठी शुल्क आकारणार नाही असे जे स्पष्ट केले आहे त्याविरुध्द संस्थेची ही भूमिका आहे. सोसायटीच्या चित्रिकरणविषयक धोरणातही स्थानिक कोकणी चित्रपटांना सर्वप्रकारच्या शुल्क माफीची तरतूद असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
चित्रपट वित्तीय योजना सूप्त अवस्थेत असताना मनोरंजन संस्थेने अशा शुल्काची मागणी करणे व ते शुल्क गोळा करणे याबद्दल त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. संस्थेने गोमंतकीय उगवत्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहनाबाबतचे लंबेचौडे दावे करण्यापूर्वी आपले बस्तान चांगले बसवावे,असा सल्ला देताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांना आपल्या "जागोर' या कोकणी निर्मितीची चांगलीच कल्पना आहे कारण त्याच्या मूहुर्ताचा क्लॅप त्यांच्याहस्तेच झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
आपल्या चित्रपटाबाबतची संस्थेची ही कृती राजकीय हेतूने प्रेरीत आहे की कोणी विशिष्ट लॉबी सोसायटीमार्फत ती कृती करीत आहे ते मनोरंजन संस्थेने स्पष्ट करावे, अशी मागणीही दामोदर नाईक यांनी केली आहे व म्हटले आहे की ,रेड कॅमेऱ्याच्या प्रगत तंत्रज्ञानावर चित्रपट चित्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे व त्यातून गोमंतकीय नवागत तंत्रज्ञ, कलाकार व सहाय्यक यांना अशा प्रकारे आपल्यामधील बुध्दीमत्ता प्रदर्शित करण्याची प्रथमच संधी मिळालेली आहे.
वास्तविक मनोरंजन सोसायटीने अशा संस्थांना एनएफडीसी वगैरेच्या धर्तीवर सर्व प्रकारचे साह्य द्यायला हवे पण प्रत्यक्षात मनोरंजन संस्ेथच्या अशा या वृत्तीमुळे लक्ष्मीकांत शेटगावकर व इतरांच्या घटनांची केवळ पुनरावृत्ती होणार नाही तर चित्रपट निर्मात्यांच्या अधिकाऱ्यांच्या चेंबरमधील खेपा मात्र वाढतील, असेही नाईक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
चित्रपट निर्मितीमधील व्यथांची आपणाला कळलेली आहे व न्यायासाठी झगडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांबरोबर आपण उभा ठाकेन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

No comments: