Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 September, 2009

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): धारगळ येथे क्रीडानगरीच्या ठिकाणी "पीपीपी' (सरकारी व खाजगी क्षेत्राच्या समन्वयातून) तत्त्वावर उभारण्यात येणारे काही महत्त्वाचे प्रकल्प मांद्रे भागात उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली सरकारी जागा या प्रकल्पासाठी देण्याचा विचार क्रीडाखात्यातर्फे सुरू असून हे प्रकल्प मांद्रे येथे स्थलांतरीत झाल्यास धारगळ क्रीडानगरीतील आणखी सुमारे ३ लाख चौरसमीटर जागा वगळणे सरकारला शक्य होणार आहे.
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरी प्रकल्प "पीपीपी' तत्त्वावर उभारण्यात येणार असल्याने त्याला जोडून याठिकाणी अनेक पंचतारांकीत प्रकल्प येणार आहेत. त्यात पंचतारांकित हॉटेल,मल्टिप्लेक्स,शॉपिंग मॉल, अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे. या पायाभूत सुविधा धारगळ येथे व्यवहार्य ठरणार नाहीत, असे मत इच्छुक कंपनीकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांनी आपला मोर्चा मांद्रे गावात वळवला आहे. काही महिन्यापूर्वी मांद्रे येथील सरकारी जमीन विक्री प्रकरणी गैरकारभार झाल्याचे दक्षता खात्याच्या चौकशीत उघडकीस आले होते. त्याचा परिणाम म्हणून उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी निलंबितही झाले होते. ही जागा परत सरकारच्या ताब्यात आल्याने तिचा वापर या प्रकल्पासाठी करण्याचा विचार क्रीडामंत्र्यांनी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. मांद्रे हा किनारी व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्याने हा प्रकल्प येथे उभारल्यास तो सर्वार्थाने व्यवहार्य ठरणार आहे. आजगावकर यांनी यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशीही चर्चा केल्याचे कळते. त्याचा सरकारने गांभीर्याने विचार चालवला आहे.
येथील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारने जागेचे फेरसर्वेक्षण सुरू ठेवले आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे असल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले आहे.अद्याप हे सर्वेक्षण पूर्ण झालेले नसून ते पूर्ण झाल्यावरच झाडांची संख्या एकूण काय असेल ते ही उघड होणार आहे.शेतकऱ्यांनी मात्र या भूसंपादनास न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.क्रीडामंत्र्यांकडून तेथील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही,असे म्हणून शेतकरी क्रीडानगरीला विरोध करतात असा गैरसमजही ते पसरवतात. शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला अजिबात विरोध नाही; पण त्यासाठी सुपीक शेतजमिनी संपादन करण्यास त्यांनी विरोध केला आहे.

No comments: