Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 August, 2009

सरकारची बेसुमार उधळपट्टी चालूच

आकडेवारीसह पर्रीकरांनी डागली तोफ

..नेत्यांच्या विदेशदौऱ्यावर
पाच कोटी रुपये खर्च
..अनिवासी भारतीय आयोगाचा
विदेश दौरा ३८ लाखांचा
..महनीय व्यक्तींचा दिल्ली
वास्तव्य खर्च १८ लाख
..मागासांसाठी कर्ज १ कोटी;
अध्यक्षांचा खर्च ११ लाख


पणजी, दि.६ (प्रतिनिधी) - विद्यमान सरकारला अर्थसंकल्पाव्दारे कोट्यवधी रुपये देणे गोमंतकीय जनतेच्या हिताचे नाही. सरकारी पैसा योग्य पद्धतीने खर्च करण्याची अजिबात कुवत या सरकारात नसून जनतेच्या पैशांची उघडपणे उधळपट्टी सुरू आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
आज विधानसभेत विनियोग विधेयकावरील चर्चेवेळी पर्रीकर यांनी सरकारच्या अनिर्बंध खर्चाबाबतच्या प्रकरणांचा पाढाच वाचून दाखवला. गेल्या दोन वर्षांत गोव्यात येणाऱ्या विविध अतिमहनीय व्यक्तींवर सुमारे ४१ लाख ११ हजार रुपये खर्च झाले. दिल्लीत अतीमहनीय व्यक्तींवर १८ लाख रुपये खर्च झाला. अनिवासी भारतीय आयुक्त विभागाच्या विदेशवारीवर ३८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहितीही पर्रीकर यांनी उघड केली. एकट्या एदूआर्द फालेरो यांनी पंचतारांकित हॉटेलच्या पाहुणचारावर ४.५० लाख रुपये खर्च केले,असेही यावेळी उघड झाले. विविध नेत्यांनी विदेशवाऱ्यांवर सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले.मागासवर्गीय मंडळाने एक कोटी रुपयांची कर्जे वितरित केली पण महामंडळ अध्यक्षांचा खर्च मात्र ११ लाख रुपयांवर पोहचला,अशी आकडेवारीही पर्रीकरांनी सादर केली. गोवा पुनर्वसन महामंडळाचे सध्या वास्को येथे एकच प्रकल्पाचे काम सुरू आहे व या महामंडळाच्या अध्यक्षांनी गेल्या दोन वर्षांत ८ लाख ७० हजार रुपये खर्च केले,असेही पर्रीकर म्हणाले.
यंदाचा अर्थसंकल्प हा ५९३९.८२ कोटी रुपयांचा आहे पण दुसरीकडे कर्जाचा बोजा वाढत असून हा आकडा ६६०० कोटी रुपयांवर पोहचल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. प्रशासनावरील सरकारचे नियंत्रण पूर्णपणे गेले आहे, त्यामुळे अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाची ६० टक्के थकबाकी देणे बाकी आहे त्यामुळे अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची गरज लागेल. भविष्यनिर्वाह निधी व इतर खर्च धरून हा खर्च ६६०० कोटी रुपयांवर पोहचणार आहे. दिल्लीहून नेमण्यात आलेले सनदी अधिकारी गोव्यात कमी व गोव्याबाहेरच जादा असतात त्यामुळे अनेकवेळा प्रशासकीय काम ठप्प होते,असा ठपकाही त्यांनी ठेवला. गेल्या दोन वर्षांत या सनदी अधिकाऱ्यांच्या देशी व विदेश वाऱ्यांवर सुमारे ३ कोटी ७ लाख रुपये खर्च झाल्याचे पर्रीकर म्हणाले. माजी मुख्य सचिव जे.पी.सिंग हे दोन वर्षांत २९ टक्के वेळ गोव्याबाहेर होते.माजी विकास आयुक्त आनंद प्रकाश ३६ टक्के, दिवानचंद २१टक्के, डॉ.मुदास्सीर १९ टक्के,यदुवंशी १८ टक्के अशी आकडेवारीच पर्रीकर यांनी दिली. ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुमारे ५७ टन तांदूळ दुर्लक्षितपणामुळे खराब झाला अशीही माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या पंचवीस वर्षांत २९ पाण्याच्या टाक्या बांधल्या त्यातील १९ टाक्यांचा खर्च आहे पण उर्वरीतांचा खर्चही खात्याकडे नाही व अनेक टाक्या केवळ बांधून तशाच ठेवण्यात आल्याचेही पर्रीकर यांनी उघड केले. मासेमारी बंदीची योग्य अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे मासेमारीत घट झाला आहे. २००५ साली ६५ किलो प्रतिवर्ष प्रती व्यक्ती असलेले प्रमाण आता ४४ किलोवर पोहचले आहे. दूध व विजेच्या बाबतीत भविष्यात भीषण संकट ओढवण्याची शक्यता वर्तवून याबाबत राज्य सरकारने उपाययोजना आखाव्यात असेही पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.कॅसिनो जहाजांच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडे कोणतीही यंत्रणा नाही, त्यामुळे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो चिंतेचा विषय बनला आहे.शेतजमिनींचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणण्याची तयारी करीत असताना इथे राज्यात मात्र सरकारकडूनच शेतजमीन संपादन केली जात आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे,असेही पर्रीकर म्हणाले. बंदर कप्तान राज्य सरकारला अजिबात जुमानत नाही. कोळसा वाहतुकीमुळे वास्कोवासियांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो,असे सांगून सरकारने त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत,असे श्री.कामत यावेळी म्हणाले.इफ्फीच्या निमित्ताने मनोरंजन संस्थेत सध्या उधळपट्टी करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे व त्याबाबत नजर ठेवण्याची आवश्यकता आहे,असे पर्रीकर यांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys