Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 3 August, 2009

पहिल्याच दिवशी ९० टन कोळंबी!

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : तब्बल पन्नास दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात आजपासून खऱ्या अर्थाने मच्छिमारी हंगामास आरंभ झाला व या व्यवसायांतील लोकांसाठी आजचा पहिला दिवस "लकी ठरला'. कधी नव्हे ती प्रचंड प्रमाणात कोळंबी आज पहिल्या दिवशी ट्रॉलरांच्या जाळ्यात सापडली. काल मध्यरात्रीपासून यांत्रिकी मच्छिमारीवरील बंदी संपुष्टात आली व यंदाच्या मच्छिमारी हंगामास पुन्हा जोरकस सुरुवात झाली.
दक्षिण गोव्यातील कुटबण व वास्को जेटीवरून मध्यरात्री ट्रॉलर खोल समुद्रात रवाना झाले आणि कोळंबींचा मोठा सांठा मिळाल्याने ते लगेच परतलेही. कुटबण जेटीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या जेटीवर आज साधारण ८० ते ९० टन कोळंबींचा व्यवहार झाला. या सूत्राने सांगितले की, पावसाळ्यात गावी गेलेले मोठ्या संख्येतील परप्रांतीय कामगार अजून न परतल्यामुळे आज मोजकेच ट्रॉलर समुद्रात गेले होते. दक्षिण गोव्यात कुटबण जेटी सर्वांत मोठी असून तेथून पाचशेहून अधिक ट्रॉलर सोडले जातात. त्यावर सुमारे दहा हजार कामगार काम करतात .
आज बाजारात प्रथमच मोठ्या प्रमाणात कोळंबी आलेली दिसली; तथापि श्रावण महिन्यामुळे त्याला हिंदूंकडून तेवढासा प्रतिसाद मिळाला नाही. वादळी हवामानामुळे यंदा मे महिन्यातच यांत्रिकी मच्छिमारी थांबविण्यात आली होती. त्यामुळे गेले ५० दिवस ही बंदी लागू होती. आता हवामान चांगले आहे, समुद्र शांत आहे व त्यामुळे हंगाम चांगला जाईल, असा विश्र्वास या क्षेत्रांतील व्यावसायिकांनी व्यक्त केला.
पणजी मार्केटही माशांची रेलचेल
दरम्यान, आज पणजी मार्केटातही पापलेटपासून कोळंबीपर्यंत आणि बांगड्यांपासून मोरीपर्यंत विविध प्रकारच्या मासळीची रेलचेल दिसून आली. त्यामुळे आजचा दिवस अट्टल मासे खवय्यांसाठी जणू पर्वणीच ठरला. कारण तब्बल दोन महिने त्यांना माशांच्या बाबतीत सक्तीचा उपवास करावा लागला होता. या काळात ही मंडळी गोड्या पाण्यातील माशांवरच अवलंबून होती.

No comments: