Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 August, 2009

७० लाख कशाला, ३० लाखांत फेरीबोट

अनिल साळगावकरांची "ऑफर'
पणजी, दि.७ (प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या नदी परिवहन खात्याने नव्या फेरीबोटी खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचा आरोप सावर्डेचे आमदार अनिल साळगांवकर यांनी केला. गेल्या डिसेंबर महिन्यात सरकारने याबाबत निविदा काढल्या. प्रत्येक नव्या फेरीबोटींवर सरकारला सुमारे ७० लाख रुपये खर्च येणार असून तीन फेरीबोटी खरेदी करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. सरकारने प्रवासी व वाहनांसाठीही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असला तरी या व्यवहारातून उत्पन्न ५ लाख ६४ हजार व खर्च मात्र १० लाख रुपये होणार आहे. हा प्रकार म्हणजे "नाकापेक्षा मोती जड'असाच आहे. प्रवासी व दुचाकीसाठी फक्त ३० लाख रुपयांत फेरीबोट देण्याचा प्रस्ताव आपण सरकारला पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री.साळगावकर यांनी ही माहिती दिली.विधानसभेत याबाबत आपण केलेल्या विधानावरून काही लोकांना गैरसमज झाला, त्यामुळेच आपण स्पष्टीकरण करीत असल्याचे ते म्हणाले. गोव्यात एकूण १९ फेरीमार्ग आहेत. या मार्गाची रुंदी १५० ते १५०० मीटरपर्यंत आहे.सध्या सुरू असलेल्या फेरीबोटी पोर्तुगिजकालीन संकल्पनेच्या आहेत, त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.सध्याच्या फेरीबोटी जुन्या झाल्या आहेत, त्यात बंद पडणे,नादुरुस्त होणे किंवा प्रवाशांना ताटकळत राहावे लागणे आदी प्रकार सुरूच आहेत. सगळ्यात मार्गांवर अशाच प्रकारच्या फेरीबोटी हव्यात असे अजिबात नाही. काही मार्गावर फक्त प्रवासी व दुचाकीसाठी फेरीबोटीची व्यवस्था झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होईल.आपण तयार केलेली फेरीबोटीचा गती अधिक असेल तसेच ती काही प्रमाणात छोटी असणार असल्याने पटापट फेऱ्या मारणे शक्य होईल.उदाहरणार्थ त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी- बेती मार्गावर जादातर दुचाकी व प्रवासी प्रवास करतात. चोडण मार्गावर एक फेरी प्रवाशांसाठी व दुसरी वाहनांसाठी अशीही व्यवस्था होऊ शकते. दिवाडी मार्गावर रायबंदर व जुने गोवे असे दोन मार्ग आहेत, त्यामुळे एका मार्गावर केवळ दुचाकी व प्रवाशांसाठी सोय करून दुसरा मार्ग इतर वाहनांसाठी ठेवला जाऊ शकतो,असेही ते म्हणाले.
येत्या १९ डिसेंबर २००९ रोजी पहिली फेरीबोट सरकारला दान करून प्रवाशांना रोजच्या फेरीप्रवासातून काही प्रमाणात मुक्तता देण्याचा संकल्प आपण केल्याचे ते म्हणाले. ही पहिली फेरीबोट खाण उद्योग सुरू असलेल्या वळवई-सुर्ला या फेरीमार्गावर सुरू करण्याचे ठरवले आहे,असेही ते म्हणाले. उर्वरित दोन फेरीबोटी आपण तयार करून ठेवणार. पहिल्या फेरीबोटीचा अंदाज आल्यानंतर सरकारला या फेरीबोटी खरेदी किंवा भाडेपट्टीवर घेण्याचा प्रस्तावही आपण ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या फेरीबोटी कुठ्ठाळी येथील साळगांवकर यांच्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये तयार करण्यात येणार आहेत.

No comments: