Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 August, 2009

पेडणे महामार्गावर वाटमारी करणाऱ्या पाच जणांना अटक

वाहने अडवून लूटमारीचे प्रकार

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी) - मालपे - पेडणे राष्ट्रीय महामार्गावर बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या एकूण ५ जणांच्या टोळीला पेडणे पोलिसांनी ६ रोजी पहाटे शिताफीने अटक केली. त्यात सिरील लुईस डायस (३२)देवसू कोरगांव, थॉमस फ्रान्सिस फर्नांडिस (२९) पोरस्कडे, मारयान कामील फर्नांडिस (४८) कुंकळ्ळी, इनासियो लोबो (२२) विर्नोडा व सत्यवान शांताराम गांवकर (३०) पोरस्कडे यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
लूटमार करण्यासाठी वापरण्यात आलेली ऍक्टिवा जीए. ०८ सी. ९०२१ व मोटरसायकल जी.ए.०३इ४३०१ ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
सविस्तर माहितीनुसार मालपे - पेडणे येथील राष्ट्रीय महामार्गावर चढावाच्या रस्त्यावर पहाटे १.३० वाजता मधोमध संशयित आरोपींनी चार दगड ठेवून रस्ता अडवला. त्याच वेळी मार्बल व ५० खाली बॅरल घेऊन राजस्थानमधून आलेला व पिळर्ण येथे जात असलेला क्र. आर.जे.१९ जी. ३३०९ हा ट्रक त्याठिकाणी आला असता, ट्रकचालकाला अडथळे दिसले. त्याचवेळी मागून ऍक्टिवा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्या ट्रकला ओव्हरटेक केले व पुढे जाऊन आपले वाहन थांबवले. त्या तिघांनी हातात दगड घेऊन वाहनाचे दोन दिवे फोडले व चालक दौलतराम तुलशीराम चौधरी व भक्ताराम रामजी विष्णोई या दोघांना जबर मारहाण केली व पैशांची मागणी करू लागले. ट्रक चालकाने आपल्याकडील पाकिटामध्ये फक्त २०० रु. असल्याचे त्यांना दाखवले असता, ते तिघे बरेच खवळले. चालकाला गाडीतून बाहेर काढून एकटा ट्रकच्या केबिनमध्ये शिरला. आतमध्ये देवांच्या प्रतिमेजवळ असलेले ३००० रुपये त्यांनी काढून घेतले. मारहाण चालू असतानाच तिघांपैकी एकाने भ्रमणध्वनी करून आणखी दोघांना बोलावून घेतले. मोटरसायकलवरून इनासियो लोबो व सत्यवान शांताराम गावकर आले. तेही या दोघांना मारहाण करू लागले. त्यावेळी भक्ताराम विष्णोई हा रानात पळाला. त्याचवेळी दुसरा ट्रक (क्र.आर. जे. १७ जीए ०३८५) त्याच मार्गाने आल्यावर या संशयितांनी तो अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, पण त्यांच्याकडे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे इनासियो लोबो याने तो ट्रक बाजूच्या दरीत ढकलण्याची योजना आखली. पाचही संशयित आपली वाहने घेऊन फरार झाले. दौलतराम यांनी मात्र प्रसंगावधान राखून दोन्ही गाड्यांचे क्रमांक नोंद केले होते. त्यांनी पेडणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये, उपनिरीक्षक सचिन नार्वेकर, सत्यवान मळेवाडकर, प्रेमानंद सावळ देसाई, संदीप गावडे, मिलिंद मोटे, लाडू सावंत, विनायक पालव, व सतीश नाईक या पोलीस पथकाने आरोपी फरारी होऊ नयेत म्हणून नाकाबंदी केली. पोलिसांना पोरस्कडे येथे एका घराबाहेर दोन्ही वाहने दृष्टीस पडली. उपनिरीक्षक अजित उमर्ये यांनी त्वरित आपल्या वरिष्ठांना कळविले व जादा पोलीस मागविले. ज्या घरात ते पाचही संशयित आरोपी लपून होते, त्याठिकाणी पोलिसांनी वेढा घातला व शिताफीने पाचही संशयितांना अटक केली.
संशयितांना (३४१) गाडी अडविणे, (४२७) नुकसान करणे, (३९६) दरोडा घालणे या भारतीय दंड संहिता कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
पेडणे पोलिसांनी चांगली कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र स्वागत व अभिनंदन केले जात आहे. एका बाजूने पेडणे पोलिसांवर टीका होत असतानाच, लूटमारी करणाऱ्या टोळीला पकडल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याकडे संपर्क साधला असता, राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून रात्रीच्यावेळी लूटमारी केली जायची असा संशय होता. पेडणे पोलिस रात्रंदिन डोळ्यांत तेल घालून त्या टोळीचा शोध घेत होते. हा प्रकार मागच्या अनेक दिवसांपासून घडत होता, परंतु त्याविरोधात कुणीही तक्रार केली नाही त्यामुळे तपास लावणे कठीण होत होते, असे सांगितले.
ज्या पाच जणांच्या टोळीला पकडण्यात आले, त्यांच्याकडून आणखी चोरीचे प्रकार उघड होतात का, हे तपासाअंती स्पष्ट होईल.

No comments: