Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 3 August, 2009

शेतजमीन संपादण्यास तीव्र विरोध

दक्षिण गोव्यात शेतकऱ्यांची एकजूट

पूर्वीच्या जमिनीही परत करण्याची भव्य मेळाव्यात मागणी


मडगाव, दि. २ (प्रतिनिधी) : "गोंयच्या शेतकारांचो एकवट'तर्फे आज येथील लोहिया मैदानावर आयोजित विराट शेतकरी मेळाव्याने कोणत्याही कारणासाठी यापुढे कृषीजमीन संपादण्याचे थांबवावे व यापूर्वी अशा प्रकारे संपादलेली जमीन लोकांना परत करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. लोकांची ही मागणी अव्हेरून अशाप्रकारे जमिनी संपादण्याचा प्रकार घडला तर राज्यभरातील शेतकरी विळे व फावडी घेऊन तेथे धावून जातील व तो प्रकार बंद पाडतील, असा इशाराही दिला.
रावणफोंड येथील लागवडीखालील शेतजमीन संपादून ती परप्रांतीय विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी वापरण्याच्या सरकारच्या कृतीतून राज्यभरातील शेतकरी एकत्र आले असून त्यांनी सरकारचा हा कारभार हाणून पाडण्यासाठी कंबर कसल्याचे आजच्या सभेवरून दिसून आले.काणकोणपासून पेडणेपर्यंतचे भूमिपुत्र या सभेसाठी दुपारी ३ वा. पासून लोहिया मैदानावर स्वयंस्फूर्तीने जमले होते ते सभा सायंकाळी ६-४० वा. संपली तोपर्यंत थांबून होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
सभेत वक्त्यांनी सरकारच्या पैसेखाऊ वृत्तीवर सडकून टीका केली व त्याला धडा शिकवायचा असेल तर शेतकऱ्यांनी राजकीय मतभेद बाजूस सारून एकत्र येण्याची गरज प्रतिपादिली. अन्य काहींनी पूर्वजांची जमीन राखून ठेवायची असेल तर यापुढे लोकप्रतिनिधी निवडतानाही लोकांनी काळजी घ्यावी लागेल असे प्रतिपादिले. क्रीडांगणे, इस्पितळे, बसस्थानक, जिल्हाधिकारी संकुल, मासळीमार्केट ही अन्य नापिक जागेतही उभी करणे शक्य आहेत पण सरकार या सर्व आस्थापनांसाठी शेतीची सुपीक जमीन कवडीमोलाने संपादून त्यावर अवलंबून असलेल्यांना देशोधडीला लावत आहे असा आरोप करून मडगावातील अशा काही प्रकल्पाची उदाहरणे वक्त्यांनी दिली. तर वारका येथील एका वक्त्याने बाणावली परिसरांत अशा प्रकारे बांधकाम केलेल्या मैदानाच्या जागी मेगा प्रकल्प उभे ठाकल्याचा दावा केला.
कुंकळ्ळी येथील वक्त्याने तेथील विष्णू देसाई या शेतकऱ्याचे उदाहरण देताना बारमाही पीक घेणाऱ्या या कुंकळ्ळीतील एकमेव शेतकऱ्याची जमीन संपादन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणा कशी राबत आहे त्याचे वर्णन करून सांगितले. तर आणखी एका वक्त्याने बाबू आजगावकरांना कोणत्याही स्थितीत शेतजमिनीत क्रीडानगरी उभारू देणार नाही असा इशारा देताना तेथे बळजबरी झाली तर संपूर्ण गोव्यातील शेतकरी पेडणेत धावून जातील असे बजावले. अशाप्रकारे सर्व शेतजमिनी गिळंकृत केल्या व आज कर्नाटकाने रेती बाबत जी गोव्याची अडवणूक केली तशीच अडवणूक पालेभाज्या व अन्य वस्तूंबाबत केला तर काय खाणार, असा सवाल केला व सरकारने या सर्वांचा गंभीरपणे विचार करण्याचा वेळ आली आहे असे बजावले.
काही वक्त्यांनी तर मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, क्रीडामंत्री यांची नावे घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले व त्यांनी आपल्या चुका सुधाराव्यात किंवा संभाव्य परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवावी; ही जमीन त्यांच्या बापजाद्यांची नव्हे हे लक्षात ठेवावे असेही बजावले. खाणींनी निम्मा गोवा गिळंकृत केला आहे त्यांनी शेती बागायती नष्ट करण्याबरोबर पिण्यासाठी शुध्द पाणीही ठेवलेले नाही व सरकार हे सारे निमूटपणे पहात आहे, असे सांगून उद्या पिण्यासाठी पाणी कुठून आणणार असा सवाल वक्त्यांनी केला.
विविध बिगरसरकारी संघटनांनी संपूर्ण पाठिंबा दिलेल्या या सभेत इडा कुतिन्हो, प्रकाश एस. बाली, श्रीमती शरद गुडे, संदीप करमली, जॉन डिकॉस्ता, दुर्गादास परब, इस्तेव्ह आंद्रादी, झेवियर फर्नांडिस, जॉर्ज फर्नांडिस, ऍड. जॉन फर्नांडिस, देवजिना फर्नांडिस, सदानंद गावडे, श्रीमती शैला नायक, ताराचंद देसाई, रामा वेळीप, रिचर्ड रिबेलो, दिलीप हेगडे, सॅबी फर्नांडिस व रॉडनी आल्मेदा यांची भाषणे झाली. सर्वांनी शेतकऱ्यांना ही एकजूट कायम राखून हाक दिल्यावेळी धावून येण्याचे आवाहन केले.

No comments: