Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 February, 2009

बेकायदा कॅसिनो हटवाच, सरकारला १५ मार्चपर्यंत मुदत; अन्यथा भाजपचे तीव्र आंदोलन, पर्रीकर यांचा खणखणीत इशारा

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): भ्रष्ट कॉंग्रेस सरकारने येत्या चार आठवड्यांत मांडवी नदीत बेकायदा नांगर टाकून असलेले कॅसिनो हटवावेत; अन्यथा या कॅसिनोंविरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडणार असून त्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असा खणखणीत इशारा आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. या कॅसिनोंविरोधात चार आठवड्यांत सरकारने ठोस कारवाई न केल्यास येत्या १५ मार्चनंतर थेट कृती केली जाईल, असेही पर्रीकर यांनी बजावले.
ते आज येथे पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर लोकसभेचे दक्षिण गोवा उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर, फार्तोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक, मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी मंत्री विनय तेंडुलकर उपस्थित होते.
कोट्यवधींचा घोटाळा करून या कॅसिनोंना परवानगी देण्यात आली असून सरकारविरोधात न्यायालयात दाद मागण्यास भाजप अजिबात डरणार नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रशासनातील बडे अधिकारी आणि मंत्री अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात रांगा लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळेल, असे श्री. पर्रीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातूनच कॅसिनोंना परवाने देण्याची सूत्रे हलतात आणि आता कसले कॅसिनो धोरण आखण्याच्या बाता मारता, असा रोखठोक सवाल श्री. पर्रीकर यांनी केला. प्रत्येक कॅसिनोला परवानगी देण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा करून याविषयीचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
या घोटाळ्यात केवळ गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री नसून यांच्याबरोबर मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी, माजी मुख्य सचिव जे पी. सिंग तसेच दिल्लीतील जकात अधिकारी गुंतले असल्याच दावा यावेळी करण्यात आला. हा दावा केवळ शाब्दिक नसून त्याला ठोस पुराव्यांचा आधार आहे, असे पर्रीकर म्हणाले. या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून जकात न आकारता या जहाजांचा मार्ग मोकळा केला, असा आरोपही त्यांनी केला.
सध्या मांडवीत असलेल्या कॅसिनो जहाजांना नौकानयन महासंचालकांची परवानगी मिळालेली नाही. यातील रॉयल कॅसिनो, महाराजा कॅसिनो, किंग्ज कॅसिनो व गोवा प्राईड हे कॅसिनो मांडवीत बेकायदा नांगरून ठेवले आहेत. तसेच त्यांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना मिळाला नसल्याचाही दावा यावेळी पर्रीकर यांनी केला. हे कॅसिनो सांडपाणी कुठे सोडतात, असा प्रश्न करून या कॅसिनोंमुळे पाणी व वायुप्रदूषण होत असल्याने त्यांनी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.
पॅन इंडिया नेटवर्क इन्फ्रावेस्ट प्रा. लि.' या कंपनीच्या "महाराजा कॅसिनो' सह सध्या मांडवीत "काराव्हेला', "रियो', "प्राईड ऑफ गोवा', "किंग कॅसिनो' व "कॅसिनो रॉयल' हे पाच तरंगते कॅसिनो नांगर टाकून आहेत.
त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या कॅसिनोंनी कायदे मोडले असून त्यांच्यावरही कसलीच कारवाई केली जात नाही. याठिकाणी बंदी असलेले डिलिंग गेम, ब्लॅक जोकर, कार्ड गेम्स, असे खेळले जात असून शहरात त्यांचे दलालही फिरत असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. पणजीत दोन पंचतारांकित हॉटेलना परवानगी नसताना तेथेही कॅसिनो सुरू असल्याचे दावा त्यांनी केला.

No comments: