Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 February, 2009

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उत्तर गोव्यातही शुभारंभ न्यायालयांसाठी लाभदायी सुविधा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): तुरुंगातील कैद्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी न्यायालयांना व्हिडीओ कॉफरन्सिंगची सुविधा देणारे आणि तुरुंग व्यवस्थापन करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरल्याची घोषणा करून या सुविधेचा आज उत्तर गोवा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, तुरुंग महानिरीक्षक मिहीर वर्धन, पोलिस महानिरीक्षक किशन कुमार, साहाय्यक तुरुंग महानिरीक्षक श्री. बोडणेकर, गोवा इलॅक्ट्रॉनिकलिमिटेडचे अध्यक्ष महेंद्र खांडेपारकर उपस्थित होते. ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असून याचा राज्याला आणि पोलिसांना प्रभावीरीत्या वापर करता येईल, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोव्यानंतर आज उत्तर गोव्यात या सुविधेची सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे आग्वाद तुरुंगांत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांपर्यंत तुरुंगात थेट मोबाईल पोचत असल्याने या तुरुंगात "मोबाईल जॅमर'ही बसवण्यात आला आहे. याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या संपूर्ण सुविधेची माहिती देताना, ४२० कलमाखाली अटक केलेल्या आणि सडा वास्को तुरुंगात असलेल्या ८५ वर्षीय कैद्याची त्वरित सुनावणी संपवून त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची सूचना यावेळी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायालयाला याची सूचना केली जाणार असल्याचे यावेळी दक्षिण सत्र न्यायाधीशांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सांगितले. ही माहिती देत असतानाच विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी या ८५ वर्षीय कैद्याकडे लक्ष वेधले.
यावेळी आग्वाद तुरुंगात कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे सुरू असताना तेथील कैद्यांना तुरुंगात मोबाईल व अन्य चैनीच्या वस्तू येथील तुरुंग रक्षकच पोहोचवत असल्याचे मान्य केले. तुरुंगात "मोबाईल जॅमर' बसवण्यामागचा उद्देश काय, तुमचा तुरुंग कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न पर्रीकर यांनी केला असता, तेथील काही रक्षकच या वस्तू आत पोहोचवत असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हापसा येथे कॉन्फरन्सिंगद्वारे बोलण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे व बाल न्यायालयाचे न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा उपस्थित होते. यावेळी न्यायालयांची काय स्थिती आहे, असा प्रश्न गृहमंत्री नाईक यांनी केला असता, न्या. बाक्रे म्हणाले की, तुरुंगातील कैद्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तर तेथील तुरुंग रक्षक उपेक्षितच आहेत.
गोवा इलेक्ट्रॉनिकने खास सॉफ्टवेअर बनवले असून यात तुरुंगातील सर्व कैद्यांची सविस्तर माहिती नोंद करण्यात आली आहे. वय, शिक्षण, व्यवसाय यानुसार त्यांची नोंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कैद्यांना तुरुंगात भेटण्यासाठी येणाऱ्या त्याच्या नातेवाइकांचेही छायाचित्र काढून ठेवले जात आहे. यदाकदाचित तुरुंगात असलेले कैदी फरार झाल्यास त्याचा उपयोग पोलिसांनी होईल या हेतूनेच हे छायाचित्र काढले जात असल्याचे तुरुंग महानिरीक्षक वर्धन यांनी सांगितले.

No comments: