Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 17 February, 2009

बायणा येथे बालक बुडाला

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) - शाळेला न जाता दांडी मारून बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेलेला १३ वर्षीय आसिफ जमिल अहमद दाफेदार या बालकाचे बुडून निधन झाले.पायात "बूट'न घातल्याने शाळेत घेतले नसल्याचे निमित्त सांगून अर्ध्या वाटेवरूनच घरी परतलेला आसिफ आपल्या छोट्या भाऊ व मित्राबरोबर बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेला असता तेथे त्याचा काळ आला.
आज सकाळी १०.३० च्या सुमारास बायणा समुद्रात दोन बालक बुडत असल्याचे महम्मद इस्माईल या तरुणाच्या नजरेस येताच त्यांनी समुद्रात उडी मारून दोघांना समुद्राच्या तटावर आणले. मात्र त्यांपैकी आसिफ दाफेदार हा बालक यापूर्वीच मरण पोचला होता. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार आज सकाळी आसिफ दाफेदार त्याचा छोटा भाऊ शेबाज व मित्र नबी हे तिघेही जण आंघोळीसाठी बायणा समुद्रात उतरले असता त्यांपैकी दोघेजण बुडायला लागले. सदर घटना येथे असलेल्या महम्मद (व्यवसायाने मिस्त्री) या इसमाच्या नजरेस येताच त्यांनी पाण्यात उडी मारून दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी होत १३ वर्षीय आसिफ गतप्राण झाला. वास्को पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला व तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आसिफची आई त्याला "अवर लेडी ऑफ कंडेलारीया' शाळेत (बायणा) पोचवण्यासाठी जात असताना अर्ध्या वाटेवर आसिफला त्याचे मित्र भेटले व आपण त्यांच्या बरोबर जात असल्याचे सांगून त्याने आईला वाटेवरूनच परत पाठविले. यानंतर काही वेळाने तो घरी परतला व शाळेमध्ये पायातील "बूट' बरोबर न घातल्याने घरी पाठविल्याचे सांगून आपला छोटा भाऊ व अन्य एका मित्रांबरोबर आंघोळीसाठी गेला व नंतर सदर घटना घडली. आंघोळीच्यावेळी आसिफ, त्यांचा छोटा भाऊ व मित्रांमध्ये जास्त पाण्यात कोण जाऊ शकतो याबाबत शर्यत लागल्याचे सूत्रांनी सांगितले. बुडत असलेल्या आसिफला सुमारे ५० मीटर आतून (पाण्याच्या) महम्मद या इसमाने बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या मयत आसिफ याची शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर संध्याकाळी त्याचे पार्थिव शरीर त्याच्या नातेवाइकांकडे देण्यात आले आहे. दरम्यान मयत आसिफ हा खरोखर शाळेत गेला होता की अर्ध्या वाटेवरूनच परतला, याबाबत पोलीस चौकशी करत आहे. मयत आसिफ हा मधला भाऊ असून त्याला एक मोठा भाऊ आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

No comments: