Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 February, 2009

१५ लाखांचे अमलीपदार्थ मांद्रे व हणजूण येथे जप्त

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): हणजूण व मांद्रे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने आज छापा टाकून सुमारे पंधरा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. यात मांद्रे येथे ११लाख २५ हजार रुपयांचे कोकेन तर, हणजूण येथे ४ लाख ४९ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात रशियन नागरिक व्हिक्टर कॅप्लेन्को (४७) याच्याकडून २२५ ग्रॅम कोकेन तर भावना विकास रोका (२९) व रमय्या बुधबहादूर जहांकूरी (५५) या महिलांकडून २ किलो ४७० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५नुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिन्ही संशयितांना उद्या सकाळी पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मांद्रे व हणजूण येथे ही कारवाई करण्यात आली. रशियन नागरिक व्हिक्टर याला मांद्रे येथील वन खात्याच्या उद्यानाकडे फिरताना पोलिसांनी हटकले. असता त्याच्याकडे कोकेन सापडल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक लव्हलीन डायस, पोलिस शिपाई आनंद भंजी, दिना मांद्रेकर, साई पोकळे, विवेकानंद दिवकर, श्रीनिवासलू पिदीगो व अविनाश गावकर यांनी या कारवाईत भाग घेतला.

No comments: