Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 February, 2009

पाकमध्ये हल्ल्यात २८ जण ठार

इस्लामाबाद, दि.२० : सध्या हिंसाचाराच्या वणव्यात अडकलेल्या पाकिस्तानात आज एका अंत्ययात्रेदरम्यान आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. यात कमीत-कमी २८ जण ठार झाले असून अन्य १६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ही घटना वायव्य पाकिस्तानातील डेरा इस्माईल खान या शहरात घडली. आज येथे धर्मगुरू शेर जमां यांची अंत्ययात्रा निघाली. शेर जमा यांची काल अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आज त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी सामूहिक नमाज अदा केली जात असताना आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून टाकले. या स्फोटात उपस्थितांपैकी २८ जण जागीच ठार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पण, या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा बराच मोठा असावा, असे बोलले जात आहे.
हल्ल्यानंतर लगेचच शहरातील रुग्णालयांसह सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आणि इतरत्र सुरक्षा वाढविण्यात आली. पण, त्याचा फारसा फायदा झाली नाही. कारण लोकांनी स्फोटानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू केली. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनाही नुकसान पोहोचविले. अंत्ययात्रेत आलेल्या लोकांनीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. सरकारी कार्यालये आणि सुरक्षा दलांनाही लक्ष्य बनविण्यात आले. या सर्व प्रकाराने शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि लगेचच सर्व बाजारपेठा सामसूम झाल्या. अनेक ठिकाणी लोकांनी गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून डेरा इस्माईल खान शहरात प्रचंड जातीय हिंसाचार बोकाळला आहे. कुख्यात डेरा इस्माईल खान मशीदीत एक स्फोट काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यात एक व्यक्ती ठार तर २० जण जखमी झाले होते. तेव्हापासून शहरात सातत्याने स्फोट होत आहेत. दक्षिण वजीरिस्तानजवळचे हे शहर असून या ठिकाणीही तालिबान्यांचा प्रभाव आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

No comments: