Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 February, 2009

हरमल ग्रामसभा ग्रामस्थांनी रोखली

हरमल, दि. १७ (वार्ताहर) : हरमल येथील नियोजित "मेरिडियन रिसॉर्ट'संबंधी पंचायतीने स्पष्टीकरण दिल्याशिवाय ग्रामसभेचे कामकाज चालवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आज कामकाज रोखून धरले.प्रादेशिक आराखडा व वनरक्षण समितीची निवड अशा दोन प्रमुख विषयांवर आजच्या विशेष ग्रामसभेत चर्चा होणार होती, तथापि मेरियडिय रिसॉर्टचा मुद्दा उपस्थितांनी लावून धरत, पंचायतीची टाळाटाळ सहन केली जाणार नाही, असे सरपंच व सचिवांना सुनावले.
सरपंच सौ.प्रगती मयेकर यांनी महत्त्वाचे विषय असल्याने त्यावर चर्चा करण्यास ग्रामस्थांनी चर्चा करावी, असे आवाहन केले. तथापि कामकाज पुढे सुरू होऊ शकले नाही. आराखडाविषयक समितीचे अध्यक्ष आत्माजी नाईक यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही बोलू देण्यात आले नाही. आराखड्यासंबंधी माहिती केवळ तज्ज्ञच देऊ शकतात, असे यावेळी पंच इनासियो डिसोझा यांनी सांगितले, त्यांना इतरांनी समर्थन दिले. सरपंचांनी अशा व्यक्तीला बोलाविले जाईल, असे आश्वासन दिले.
सीआरझेड कायद्याची पायमल्ली होत असल्याची टीका उपस्थितांनी केली. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच सौ. सूचना गडेकर, द्वारकानाथ नाईक, अमीत फर्नांडिस, मधुकर ठाकूर, सुधीर नाईक व नियुक्त सदस्य भदगो हरमलकर, आत्माजी नाईक उपस्थित होते. इनासियो डिसोझा व सौ. मिलन पार्सेकर हे पंचसदस्य ग्रामस्थांमध्ये हजर होते.

No comments: