Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 February, 2009

डिचोलीत तिघे कामगार जागीच ठार, 'सुपर सोप इंडस्ट्रीज'ची भिंत कोसळली, एकजण गंभीर


डिचोली, दि. १७ (प्रतिनिधी): येथील औद्योगिक वसाहतीमधील "सुपर सोप इंडस्ट्रीज'चे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून आज सकाळी ११.३०च्या सुमारास ३ कामगार जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
डिचोली अग्निशामक दलाल माहिती मिळताच दलाचे अधिकारी लक्ष्मण एस. नाईक यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या भिंतीचे ढिगारे दूर केले. ठार झालेले सर्वजण पश्चिम बंगालमधील असून परस्परांचे नातेवाइक आहेत. विशीतील या युवकांवर मृत्यूने घाला घातल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुपर सोप इंडस्ट्रीजच्या आठ मीटर उंचीच्या भिंतीचे बांधकाम सुरू असताना चार मजूर वरती प्लास्टरींग करत होते. चौघेजण त्यांना साहित्य पुरवित होते. तेव्हा तेथे सुपरवायझर किंवा ठेकेदार वगैरे उपस्थित नव्हते. खालून वर सामान देणाऱ्या कामगारांवर त्याचवेळी भिंत कोसळली व त्याखाली ते गाडले गेले. जयदुल शेख (२०) राजकुल शेख (२०) सलीम शेख (२१) यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. करिमल शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याला अग्निशामक दलाच्या गाडीतूनच प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अशिद्दीन शेख (१९) मनिरल शेख (२०) मायकल शेख (१९) जेलीम शेख (२०) अशी अन्य जखमींची नावे असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली तेव्हा बचावकार्य सुरू होते. नरेश सावळ, नरेश कडकडे, प्रशांत धारगळकर तसेच अन्य कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी झाले होते.
निकृष्ठ बांधकामामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचे अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केला. उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनीही असेच मत व्यक्त केले.
दुर्घटनेनंतर उपजिल्हाधिकारी बुगडे नगराध्यक्ष सतीश गावकर, पोलिस उपअधीक्षक बॉसेट सिल्वा, पोलिस निरिक्षक वाझ मिनेझिस, मामलेदार प्रमोद भट, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नगरसेवक भगवान हरमलकर, बाळू बिरजे तसेच इतर अनेकांनी मदतकार्यात भाग घेतला. नरेश सावळ यांनी घटनास्थळावरुन १०८ गाडीला तसेच शववाहिका पाचारण करुन मृतदेह बांबोळी येथे नेण्यासाठी मदत केली. डिचोली औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक दीपक काकोडे, क्षेत्रीय व्यवस्थापक परमानंद गावकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नऊ मीटर उंचीच्या या बांधकामाला कसलाच आधार नसल्याचे दिसून आले. या संपूर्ण घटनेची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. सदर सुपर सोप्स या आस्थापनाचे संचालक सुहास साखळकर हे आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही, तथापि, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बांधकामासाठी कायदेशीर परवाना घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दुर्घटना स्थळी पडलेले मृतदेह पाहून अंगावर काटा उभा रहात होता. एकाचा तर कंबरेखालचा भागच तुटल्याचे दृश्य भयाण दिसत होते. अग्निशामक दलाचे आर. गावस, डी. गावस, बी. नाईक, एस. केसरकर, एस. गावस, पी. कांबळी, रतन परब, एस. पाटील, फोंडा विभागाचे अधिकारी डी. रेडकर यांनी बचावकामात मोलाचे योगदान दिले. त्यांना अमन पठाण व इतरांनी सहकार्य केले. बऱ्याच प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिघांचेही देह छिन्नविछीन्न झाले होते.

No comments: