Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 16 January, 2009

मिकी-सारा वादातून गावात संघर्ष?

सारा समर्थकांचा आज मोर्चा
मिकी समर्थकांकडून प्रत्युत्तर?

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी) : पर्यटन मंत्री मिकी पाशेको व त्यांच्या पत्नी सारा यांच्यामधील विवादाला आता गावकलहाचे रूप येण्याची चिन्हे दिसत आहे. असे झाल्यास गोव्यातील विविध संघर्षांत एका नव्या संघर्षाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिकी व सारा यांच्यामधील विवाद न्यायालयात पोहोचलेला असतानाच पर्यटनमंत्र्यांच्या काही समर्थकांनी आज येथे एक पत्रकार परिषद घेऊन सारा आणि आवडा व्हिएगश यांनी उद्या मिकी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा बेत आखल्याचा गौप्यस्फोट केला. खरोखरच असा प्रकार घडला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ब्लांक फर्नांडिस, मार्कूस डिसोझा, एजेलिंदा ब्रागांझा व एस्पेरीना फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मिकी व सारा यांच्यामधील विवाद सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्याशिवाय मिकी यांनीही साराविरुद्ध केलेल्या घटस्फोट मागणीचा अर्जही न्यायालयात आहे. कोणतेही प्रकरण न्यायालयात असताना अशा प्रकारची कृती न करता निवाड्याची प्रतीक्षा करणे हेच योग्य आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी उद्या गावात मोर्चा काढून तेथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल. यामुळे गावात तणाव निर्माण झाला व परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याला सर्वस्वी सारा व त्यांना फूस देणारी मंडळी जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.
मिकी हा तत्त्वाचा माणूस असल्याचे त्यांनी ठणकावले व उद्याच्या मोर्चामागे मंत्री चर्चिल आलेमांव असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत १०० वर महिला हजर होत्या.

No comments: