Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 January, 2009

क्रीडानगरीतून शेतकऱ्यांची जमीन वगळा : श्रीपाद नाईक

मोरजी, दि. ११ (वार्ताहर): शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयासाने काजू, आंबे, फणस, कोकमची झाडे लावून वसवलेली जागा नियोजित क्रीडानगरीतून वगळावी अशी मागणी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी केली. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला किंमत असते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मताचा आदर सरकारने करायला हवा. या बागायतीवर नांगर फिरवण्याचा सरकारने प्रयत्न केला तर तो शेतकऱ्यांचा सहकार्याने हाणून पाडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
धारगळ येथील होऊ घातलेल्या क्रीडा नगरीच्या नियोजित जागेत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने, प्रयासाने परिश्रमातून झाले लावली, त्या बागायतीची पाहणी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी आज (११ रोजी) शेतकऱ्यांसोबत केली व येथील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.
धारगळ पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या क्रीडा नगरीविषयी विविध वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या बातम्या झळकत असूनही शेतकऱ्यांच्या मताला आजपर्यंत सरकारने दाद दिलेली नाही. यापुढेही जर सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल असे मत काही शेतकऱ्यांनी खासदार श्रीपाद नाईक यांच्याकडे आपल्या समस्या मांडताना व्यक्त केले.
येथील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीतील झाडे ही आपल्या लहान मुलांसारखी जपलेली आहे. ती जागा सरकारने क्रीडा नगरीतून वगळून इतर ९ लाख चौरस मीटर जागा आहे ती घ्यावी, त्यास शेतकऱ्यांचा विरोध नसेल. कोट्यांनी रुपये खर्च करून या भागात आता तिळारी पाणी प्रकल्पाचे कालवे बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. शेताला पाणी मिळते त्याचवेळी शेतीच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर सरकारच्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या योजना या कशासाठी आणि कोणासाठी, असा खडा सवाल खासदार श्रीपाद नाईक यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांविषयी सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी व बागायती जाणार त्याची परतफेड पैशाने करता येत नाही. ज्याने कष्ट घेतले त्यालाच त्याची किंमत कळू शकते त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच क्रीडानगरी उभारावी. केवळ हट्टाला पेटून क्रीडानगरी उभारणारच अशी घोषणा करण्यापूर्वी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, त्या शेतात लावलेली झाडे तसेच त्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी व नंतरच काय तो निर्णय घ्यावा, असा सल्ला नाईक यांनी दिला.
दरम्यान, यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपापल्या कैफियती मांडताना सांगितले की, ज्या ठिकाणी क्रीडानगरी होणार आहे त्या जागेतील ५ ते २० वर्षापूर्वीची झाडे लावल्यानंतर त्यांना खराटा गाडीतून खांद्यावर पाण्याच्या घागरी घेऊन मैलाचे अंतर पायदळी तुडवून पाणी देण्यात आले होते. या झाडांपासून आता उत्पन्न मिळण्याची वेळ आली असता सरकार आमची झाडे नष्ट करून पाहत आहे. यामुळे नियोजित क्रीडानगरीतून सदर जमीन वगळून इतर ओसाड जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
दरम्यान गेल्यावेळी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे शेतजमीन मालक चर्चेसाठी गेले असता त्यांना झिडकारून टाकल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरपंच, उपसरपंच व पंच सदस्यांपैकी काहींना हाताशी धरून क्रीडामंत्री प्रकल्प साकारण्यास पाठिंब्याची अपेक्षा ठेवत आहेत. नोकऱ्या कोणत्या पद्धतीच्या मिळतील हे एकाही सरपंचाला माहिती नाही. क्रीडानगरीतून कुणाचे हित आहे हे सुशिक्षित जनतेला ठाऊक आहे. केवळ घोषणा करण्यापूर्वी ज्यांच्या शेतजमिनी जातील त्यांना विश्वासात घ्यायला वेळ सरकारला नसेल तर त्याने क्रीडा नगरीचा फेरविचार करावा असा सल्ला शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी ओशेल बाग, धारगळ व विर्नोडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीपाद नाईक यांनी आपण या शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या व मागण्या सरकार समोर मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys