Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 14 January, 2009

३.३७ लाखांची रक्कम भर दिवसा पळविली मडगाव पोलिस स्थानकालगतची घटना

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : येथील पोलिस स्थानकाला लागूनच असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेतून पैसे काढून बाहेर आलेल्या कुंकळ्ळी येथील उद्योजकाची ३.३७ लाखांची रक्कम पळवण्याचा प्रकार आज दुपारी येथे घडला. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ माजली आहे.
काही काळापूर्वी, बॅंकातून बाहेर आलेल्या लोकांना 'तुमची नोट पडली आहे,' असे उगाचच सांगून लुबाडले जात होते. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणात घडलेला आहे. त्यामुळे परत एखादी परप्रांतिय टोळी तर आलेली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास चालवला आहे.
कुंकळ्ळी येथील आबेलीन इब्राहिम हे उद्योजक आज दुपारी पोलिस स्थानकाजवळील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये गेले व तेथून त्यांनी ३.३७ लाखांची रक्कम काढून बॅगेत ठेवली. नंतर त्यांनी रिलायन्समध्ये जाऊन एक बिल भरले. बॅंकेजवळ पार्किंगला जागा नसल्याने काही अंतरावर ठेवलेल्या गाडीकडे ते जात असताना कोणीतरी मागून त्यांना शर्टाला काही तरी लागल्याचे सांगितले. ते ऐकून सांगणारा कोण याची शहानिशा न करता अनवधानाने त्यांनी सगळी रक्कम असलेली बॅग खाली ठेवली व शर्ट काढून पाहिले तर काहीच नाही ते पाहून मागे वळले. तेव्हा जवळपास कोणीच नाही व खाली बॅगही नाही असे पाहताच ते चक्रावले. आपण फसवले गेल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
कपड्याला घाण लागल्याचे वा गाडीचे दार उघडताना खाली नोट पडल्याचे सांगून संबंधित व्यक्ती नोट शोधू लागल्याचे पाहून गाडीतील वा तिच्या हातातील बॅग अथवा किंमती वस्तू घेऊन पोबारा करण्याचे प्रकार यापूर्वी घडत होते. मध्यंतरी बंद पडलेले हे प्रकार आजच्या घटनेनंतर पुन्हा सुरू झालेले तर नाहीत ना, तसेच त्यामागे एखादी आंतरराज्य टोळी तर नाही ना, याचा शोध पोलिस घेत आहेत.

No comments: