Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 January, 2009

सत्यम महाघोटाळा: राजू बंधूंना सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक

सीएफओ श्रीनिवास यांना २३ पर्यंत कोठडी
-----------------------
दीपक पारेख, किरण कर्णिक 'सत्यम' चे नवे संचालक, आज बैठक

नवी दिल्ली, दि. ११ : सत्यम कॉम्प्युटर्सची स्थिती सावरण्यासाठी आज सरकारने नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केली आहे.
या नव्या संचालक मंडळात दीपक पारेख, नॅसकॉमचे अध्यक्ष किरण कर्णिक आणि सेबीचे माजी सदस्य सी.अच्युतन यांचा समावेश आहे. हे तीन सदस्यीय संचालक मंडळ आता विचारविनिमय करून इतर संचालकांची नावे ठरवतील, अशी माहिती केंद्रातील कंपनी कामकाजमंत्री पी. सी. गुप्ता यांनी दिली.
डॉ. दीपक पारेख हे हाउसिंग डेव्हलपमेंट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. किरण कर्णिक हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वश्रुत असे नाव आहे. यांच्याव्यतिरिक्त संचालक मंडळावर किमान दहा सदस्यांची नियुक्ती केली जाईल. संचालक मंडळामध्ये वित्तीय, माहिती तंत्रज्ञान, प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जाणार आहे.
-------------------------------------

हैद्राबाद, दि. ११ : सत्यम कॉम्प्युटर्समधील कोट्यवधींच्या घोटाळ्याची कबुली देण्यापूर्वी राजाच्या ऐटीत राहणारे बी. रामलिंग राजू यांना आरोपी म्हणून कारागृहात साध्या कैद्याप्रमाणे कालची रात्र जमिनीवर झोपून काढावी लागली.
सत्यम घोटाळाप्रकरणी आरोपी असणाऱ्या बी. रामलिंग राजू आणि त्यांचे बंधू रामा राजू या दोघांना स्थानिक न्यायालयाने काल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्या दोघांचीही रवानगी चंचलगुडा कारागृहात करण्यात आली. तेथे या दोघांना २८ कैद्यांसोबत कोठडीत ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत असणाऱ्या कैद्यांमध्ये चोरी, हुंडाबळी, फसवणूक आदी गुन्ह्यांमधील आरोपी होते. त्यांच्याप्रमाणे या राजू बंधूंनाही जमिनीवर झोपावे लागले.
"क' श्रेणीतील कैदी असणाऱ्या राजू यांना दिवसातून तीन वेळा ६५० ग्रॅम भात, १ पाव भाजी आणि १२५ ग्रॅम वरण दिले जाणार आहे. दिवसातून दोन वेळा चहा मिळेल. पण, त्यांच्या बॅरेकमध्ये टीव्ही नसेल. फक्त एक वर्तमानपत्र मिळेल.

सीआयडीचे छापे
सत्यममधील महाघोटाळ्याची चौकशी करणाऱ्या आंध्रातील सीआयडीने आज कंपनीच्या परिसरात आणि संचालकांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या राजू यांच्या निवासस्थानावरही आज छापे मारण्यात आले. त्यांचा संगणक आणि लॅपटॉप चौकशी अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे समजते.
चौकशीचा एक भाग म्हणून हे धाडसत्र राबविण्यात आल्याचे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरातील सत्यमच्या अन्य ठिकाणांवरही छापे मारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीनिवास २३ पर्यंत न्यायालयीन कोठडीत
सत्यमचे सीएफओ वल्दमणी श्रीनिवास यांना स्थानिक न्यायालयाने आज २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांचा जामीन अर्ज उद्या न्यायालयात सादर होणार आहे. सोबतच त्यांचा ताबा मागण्यासाठी पोलिसही उद्या अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
सत्यममधील घोटाळा प्रकरणी राजू बंधूंसह श्रीनिवास यांनीही अटक करण्यात आली होती.

No comments: