Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 October, 2008

पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल, पर्यटन मोसमात येणार ७०० विमाने


दाबोळी विमानतळावर उतरलेल्या पर्यटकांचे स्वागत करताना पर्यटन खात्याचे कर्मचारी (छाया: पंकज शेट्ये)

वास्को, दि. ९ (प्रतिनिधी): राज्याच्या पर्यटन मोसमातील पहिली दोन विदेशी चार्टर विमाने आज दाबोळी विमानतळावर उतरली. जर्मनी येथून २२८ प्रवाशांना घेऊन आलेल्या "कोंडोर एअरलाईन्स' या पहिल्या विमानाच्या आगमनानंतर काही वेळातच १५० रशियन पर्यटकांना घेऊन आलेले दुसरे चार्टर विमान गोमंतभूमीत दाखल झाले.
गोव्याच्या पर्यटन मोसमातील पहिले विमान आज येणार असल्याची माहिती मिळाल्याने दाबोळी विमानतळाचे संचालन पॉल मणिक्कम, पर्यटन खात्याचे कर्मचारी तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी पहाटेच विमानतळावर दाखल झाले होते. सकाळी ४.३० च्या सुमारास युरोपच्या पर्यटकांना घेऊन आलेले फ्रॅंकफर्ट येथील पहिले विमान दाबोळी येथे दाखल झाले. विमानतळावर उतरलेल्या २२८ प्रवाशांचे यावेळी पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. पोलिस खात्याचे वाद्य पथक व एक खासगी बॅंड येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी उपस्थित होता.
कोंडोर एअरलाईन्सचे विमान प्रतिनिधी जुआंव (बुश) झेव्हियर मिरांडा यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की यंदाच्या पर्यटन मोसमात कोंडोरची ५४ विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार आहेत. पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, देशातील दहशतवादी कृत्यांमुळे पर्यटन व्यवसायावर कोणताच फरक पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्कार्लेट हत्या प्रकरणामुळे काही फरक पडला का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत अशा घटना घडत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षांपासून गोव्यात येणाऱ्या मातायस व एंजेलिका या पर्यटकांनी "वी लव गोवा' अशी आरोळी ठोकली. दहशतवाद्यांना देव सद्बुद्धी देवो, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रशियन प्रवाशांना घेऊन आलेले दुसरे विमान ११ वाजण्याच्या सुमारास गोव्यात दाखल झाले.
---------------------------------------------------------------------------
पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावर ३०० रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पॉल मणिक्कम यांनी दिली. यंदाच्या मोसमात ७०० चार्टर विमाने गोव्यात येणार असून यात वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. गेल्या वर्षी ७३५ चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली होती. परंतु, वीज पुरवठा व इतर गोष्टींमुळे विमानतळावर असुविधा निर्माण झाली होती. यंदा अनेक सोयी पुरवण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे श्री. मणिक्कम यांनी शेवटी सांगितले.

No comments: