Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 October, 2008

संपुआ-सपाच्या बैठकीत जामिया चकमक गाजणार

अमरसिंगांची न्यायालयीन चौकशी मागणी
नवी दिल्ली, दि. ८ : समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंग यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन जामिया नगर येथे झालेल्या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र, या संदर्भात अमरसिंग यांना पंतप्रधानांनी कोणतेही आश्वासन दिले नाही.
ही सर्व माहिती स्वत: अमरसिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांना दिली. मी पंतप्रधानांकडे या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही किंवा कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे आता आमच्या पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव या चकमक प्रकरणाची चर्चा संपुआ व सपा यांच्यात होणाऱ्या बैठकीत करणार आहेत. ही बैठक येत्या १४ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे, असेही अमरसिंग म्हणाले.
जामिया नगर येथे झालेल्या चकमकीनंतर अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे सपाला वाटत आहे. आसामात मुसलमानांवर होत असलेले हल्ले आणि महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना यामुळे ही भावना निर्माण होत आहे, असेही अमरसिंग म्हणाले.
पंतप्रधानांसोबत अमरसिंग यांनी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन उपस्थित होते. या बैठकीत अल्पसंख्यक समुदायावर होत असलेले हल्ले आणि भारत-अमेरिका अणुकरार या दोन मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहितीही अमरसिंग यांनी दिली.

No comments: