Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 October, 2008

काश्मिरातील कट्टरवादी हे अतिरेकीच - झरदारी

"भारताकडून पाकला धोका नाही'
न्यूयॉर्क, दि. ५ ः काश्मिरात विविध दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या कारवाया अतिरेकी असल्याचे वक्तव्य प्रथमच देताना पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकला भारताकडून कोणताही धोका असल्याचे आपल्याला वाटत नाही, असे म्हटले आहे.काश्मीरमध्ये कारवाया करणारे "अतिरेकीच' असल्याचे वक्तव्यही झरदारी यांनी दिले. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ काश्मिरातील अतिरेक्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणत असत, हे येथे उल्लेखनीय.
"वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी म्हणाले की, भारत हा कधीही पाककरिता धोकादायक नव्हता. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी प्रतिमा आहे त्यामुळे आम्हाला कधीही असुरक्षित वाटले नाही. हे केवळ माझे वैयक्तिक मत नसून आमच्या संपूर्ण सरकारचेच मत आहे. जोवर पाकला भारताच्या बरोबरीत समजले जात आहे तोवर भारत-अमेरिका अणुकरारावर आम्हाला कोणतीही हरकत नाही. या दोन देशांची मैत्री आमच्यासाठी चिंतेची बाब होण्याचे कारणच नाही. कारण यापैकी एक देश म्हणजे, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि दुसरा देश म्हणजे सर्वात जुनी लोकशाही आहे. अशा दोन देशांच्या मैत्रीने आमचा जळफळाट होण्याचे काहीच कारण नाही, असे झरदारी म्हणाले.
भारतसोबत आम्हीही मुक्त व्यापारास सुरुवात करणार आहोत. असे झाले तर हा निर्णय स्वागतार्ह, आश्चर्यकारक आणि तितकाच ऐतिहासिकही ठरेल. भारतासोबतचे आमचे संबंध सुधारण्याचाच आमचा प्रयत्न राहणार आहे. आमच्यासारख्या देशांना आर्थिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही झरदारी म्हणाले.

No comments: