Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 October, 2008

विश्वासराव चौगुले कालवश

आधुनिक गोव्याचे शिल्पकार; मान्यवरांची आदरांजली
पणजी व वास्को, दि. ४ (प्रतिनिधी) - गोव्याच्या औद्योगिक विश्वाचे शिल्पकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच आघाडीवर राहून सामान्यांशी आपली नाळ कायम जोडून ठेवलेले आदरणीय उद्योगपती श्रीमान विश्वासराव दत्ताजीराव चौगुले यांचे आज सकाळी ८.४५ वाजता बायणा वास्को येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने देहावसान झाले. आपल्या अजोड कर्तृत्वाने एकेकाळी "देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती' म्हणून संसदेत गौरवले गेलेले श्रीमान चौगुले निधनसमयी ९४ वर्षांचे होते. केवळ गोव्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर चौगुले यांनी नावलौकीक मिळवला होता. श्रीमान चौगुले यांच्या निधनाबद्दल समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले असून एक उत्तुंग व्यक्तीमत्व व अभिमानास्पद पर्व अस्ताला गेल्याचे उद्गार त्यांनी काढले.
आज संध्याकाळी बायणा येथील त्यांच्या निवासस्थानाहुन शेकडो वाहनांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. गादेगाळ बिर्ला येथील चौगुले परिवाराच्या कौटुंबीक स्मशानभूमीत त्यांचे पुत्र उमाजी चौगुले यांनी त्यांना अग्नी दिला. श्रीमान चौगुले यांच्या पश्चात पुत्र विजय,अशोक व उमाजी तर कन्या सरिता,रोहीणी व पद्मा यांचा समावेश आहे. श्रीमान विश्वासराव चौगुले यांच्या देहावसानाची वार्ता राज्यांत व राज्याबाहेरही सर्वत्र पसरताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी तसेच चौगुले उद्योगासमूहासह इतर अनेक प्रख्यात उद्योग समूह, शैक्षणिक, राजकीय,व्यवसायिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींनी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली. राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.विश्वासराव चौगुले यांच्या जाण्याने गोव्याने थोर पुत्राला गमावल्याचे उद्गार काढून गोवा हे देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वांत उच्च राज्य बनावे हे त्यांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावून श्रीमान विश्वासराव यांना श्रद्धांजली वाहीली. त्यामध्ये उद्योगपती शिवानंद साळगावकर, धेंपो उद्योग समूहाचे श्रीनिवास धेंपो,आमदार अनिल साळगावकर,सभापती प्रतापसिंह राणे,माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड.रमाकांत खलप, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर,दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष दिगंबर आमोणकर,मुरगावचे आमदार मिलिंद नाईक,उद्योजक नगीनभाई ठक्कर,वसंतराव ऊर्फ अण्णा जोशी, परेश जोशी आदी मंडळी उपस्थीत होती.
समाजाभिमुख उद्योगपती
गोवा मुक्तीपूर्व खाण व्यवसायाचा पाया रचून लोह खनिजाची आयात-निर्यात करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. खाण व्यवसायाबरोबर इतर व्यवसायातही त्यांनी उडी घेण्याचे धाडस करताना त्यातही त्यांनी निर्भेळ यश संपादन केले. राज्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना वृत्तपत्र व्यवसायातही प्रवेश करून "गोमन्तक' वर्तमानपत्र सुरू केले. आपल्या व्यवसायिक मार्गक्रमणात त्यांनी समाजाकडेही तेवढेच लक्ष देत समाजाप्रती आपले कर्तव्य बजावल्यानेच ते समाजाभिमुख उद्योगपती बनले.
गोवा मुक्त झाल्यावर येथील उद्योगांना योग्य दीशा व नियोजनाची गरज होती. त्यासाठी त्यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचा पाया रचला. त्यांनी आपला उद्योग गोव्यासह महाराष्ट्र,गुजरात आणि कर्नाटकातही पसरवून तिथेही आपला पाया रचला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गोवा मुक्तीनंतर त्यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीने गोव्यात पहिले कॉलेज स्थापन केले. प्राथमिक,उच्च माध्यमिक शाळांबरोबर जहाजबांधणीलाही त्यांनी चालना दिली. या क्षेत्रात त्यांनी जबरदस्त नाव कमावले.
हजारोंचा पोशिंदा
सध्या चौगुले उद्योग समूहात सुमारे सहा हजार लोक कामाला आहेत. श्रीमान विश्वासराव चौगुले यांनी पाया रचलेल्या विविध उद्योगांमार्फत राज्यात सुमारे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. यावरून त्यांच्या अचाट कर्तृत्वाची ओळख पटते.

No comments: