Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 October, 2008

भुमिपूत्रांना लाथ; परप्रांतियांना साथ

कॉंग्रेस आघाडी सरकारची संतापजनक कृती
पणजी, दि. ८(प्रतिनिधी) : गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीतांची संख्या वाढत असून येथे भुमिपूत्रच पोरके होऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून गोमंतकीयांच्या पोटावर लाथ मारून बिगरगोमंतकीयांचे चोचले पुरवण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
आत्तापर्यंत गोमंतकीयांना रोजगार देण्याच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या उद्योगांत येथील स्थानिकांना डावलण्याचे प्रकार ताजे असताना आता खुद्द सरकारकडूनच स्थानिकांच्या पोटावर नांगर फिरवण्याची हीन कृती सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या गोवा कंत्राटी कामगार भरती सोसायटीअंतर्गत विविध सरकारी खात्यांत चतुर्थश्रेणी कंत्राटी कामगारांना कामावरून काढले जात आहे. त्याचबरोबर ही कंत्राटे आपल्या मर्जीतील खाजगी नोकर भरती संस्थांना देण्याचा सपाटा सुरू आहे. या खाजगी संस्थांकडून सर्वत्र बिगर गोमंतकीयांची कामगारांची भरती सुरू असून या लोकांचा हाती नाममात्रपगार ठेवून उर्वरित पैशांची दलाली उकळण्याचा नवा उद्योग राज्यात फोफावला आहे.
गोव्यातील स्थानिक बेरोजगार युवक-युवती केवळ पांढरपेशी नोकरी शोधतात व चतुर्थश्रेणीचे काम करण्यास राजी होत नाही, हा केवळ गैरसमज आहे. किमान वेतन व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास ही कामे करण्यास असंख्य स्थानिक बेरोजगार तयार आहेत, हे पर्रीकर यांनी या सोसायटीमार्फत सिद्ध केले होते.गेल्या २००१ साली स्थापन करण्यात आलेल्या या सोसायटीत भरती केलेल्या एकूण १३२२ कामगारांची संख्या आता ५७१ वर आली आहे. कोणत्याही सरकारी खात्यात रोजंदारी किंवा कंत्राटी पद्धतीवर सेवेची गरज भासल्यास ही भरती सोसायटीअंतर्गत करण्याचे तात्कालीन भाजप सरकारने काढलेल्या आदेशाला कचरा पेटी दाखवून आता ही भरती खुल्या पद्धतीने करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
दरम्यान,सध्या स्थानिक व बिगरगोमंतकीय अशा वादाचे संकेत मिळाल्याने गेल्या वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने नव्याने कंत्राटी किंवा पर्यायी नोकर भरतीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय ताजा असताना गेल्या १ ऑक्टोबर रोजी मानसोपचार केंद्रातील सुमारे २९ स्थानिक झाडूवाल्यांना कामावरून खाली करण्याचे आदेश काढून सरकारने आपल्याच निर्णयाला हरताळ फासण्याचा प्रकार घडला आहे.
सोसायटीअंतर्गत नेमण्यात आलेल्या कामगारांना किमान वेतन,बोनस व इतर सुविधा पुरवण्यात येतात. पर्वरी सचिवालय तथा गोवा आरोग्य महाविद्यालयात स्थानिक सुरक्षा रक्षकांना घरी पाठवून बिगरगोमंतकीयांची भरती करण्यात आल्याचे उदाहरण ताजे असून या सरकारचा "नीज गोंयकारां'विरोधात छुपा अजेंडा असल्याची टीका सुरू झाली आहे.

विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून ३१ ऑगस्ट २००७ पासून सोसायटीअंतर्गत विविध खात्यांतून कमी आलेल्या कामगारांचा तपशील असा :
-गोवा राज्य बाल आयोग-३
-तंत्रिकशिक्षण संचालनालय-१२
-जलसंसाधन खाते,पाजीमळ-सांगे-९
-वास्को नगरपालिका-२
-गोवा पुनर्वसन मंडळ-४
-गोवा तंत्रशिक्षण,आल्तीनो-१८
-गोवा राज्य मागासवर्गीय मंडळ-१
-गोवा राज्य महिला आयोग-१
-गोवा राज्य समाज कल्याण मंडळ-१
-शिक्षण संचालनालय-१
-लेखा संचालनालय-२
-एनसीएओआर,हेडलॅण्ड सडा वास्को-१
-वाहतूक संचालनालय-१८
-खाण संचालनालय-५
-विक्री कर आयोग-२
-वीज खाते-१०७
-गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ-१
-कामगार रोजगार आयोग-१
-सरकारी तंत्रनिकेतन,मये-१६
-उत्तर गोवा जिल्हाधिकारी-८
-मामलतदार,मडगाव-१
-उद्योग संचालनालय-१
-वन खाते-९
-आरोग्य खाते-१
-गोवा शिपयार्ड,वास्को-२
-उत्तर गोवा जिल्हा पंचायत-१
-दक्षिण गोवा जिल्हाधिकारी-१३
-सरकारी कला,वाणिज्य महाविद्यालय,खांडोळा-२
-प्रोव्हेदोरीया खाते-१

-मडगाव पालिका-३
-गोवा वस्तुसंग्रहालय-३७
-उच्च शिक्षण संचालनालय-३
-हॉस्पिसियू,मडगाव-९
-कदंब महामंडळ-३
-संजीवनी साखर कारखाना-१६
-गोवा शिक्षण विकास महामंडळ-७
-गोवा लेखा भवन,पर्वरी-२
-गोवा विद्यापीठ,ताळगाव-८
-मानसोपचार केंद्र,बांबोळी-३०
-सार्वजनिक बांधकाम खाते-७
-मामलतदार,सासष्टी-७
-हस्तकारागिर प्रशिक्षण खाते-४
-मामलेदार,मुरगाव-१
-गोवा हस्तकला महामंडळ-४
-सरकारी कला व वाणिज्य महाविद्यालय-६
-गोवा औद्योगिक विकास महामंडळ-१४
-सरकारी मुद्रणालय-१

No comments: