Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 November, 2008

महापौरांच्या आसनावर विद्यार्थ्यांनी ओतला कचरा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) -मळा परिसरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालल्याने या परिसरातील पाच विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आज सकाळी पणजी महापालिकेवर धडक मोर्चा काढून महापौराच्या टेबलवर आणि खुर्चीवर कचरा ओतला. या घटनेने हादरलेल्या महापौरांनी दुपारी २.३० वाजता विद्यालयाच्या शिक्षकांची आणि कचरा प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या समितीची खास बैठक बोलावली. या बैठकीत शिक्षक आणि महापालिका यांच्यात एकमत झाल्याने २२ नोव्हेंबरपर्यंत सरकारला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. यात सरकार अयशस्वी ठरल्यास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटना दिवशी विद्यार्थ्यांसह महापालिकेनेही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पाटो कॉम्प्लेक्स याठिकाणी असलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पात बेकायदा कचरा टाकला जात असल्याने पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच महापालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांच्या सहीनिशी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकल्पात कचरा न टाकण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देऊनही त्याठिकाणी कचरा टाकला जात असल्याने त्याची त्वरित चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी महापालिकेने आपण कचरा टाकला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मळा परिसरात असलेल्या विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तसेच येथील स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
महापालिकेच्या सभागृहात दुपारी शिक्षकांना बैठकीसाठी बोलावून अर्धा तास सभागृहात बसवून ठेवले. यावेळी या शिक्षकांना कोणतीही माहिती न देताच महापौरांच्या दालनात बैठक सुरू करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी तेथील एका कारकुनाला बैठकीविषयी विचारले असता बैठक महापौरांच्या दालनात सुरू झाल्याचे सांगण्यात आले. बैठकीत शिक्षकांना सहभागी करून घ्यायचे नव्हेत तर, का बोलावण्यात आले असा प्रश्न केल्यानंतर या शिक्षकाना बैठकीत घेण्यात आले. या घटनेमुळे शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला तर, यापुढे महापालिकेकडून असा प्रकार घडल्यास या प्रश्नावर पालिकेला सहकार्य करणार नसल्याचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांनी सांगितले.
मळा परिसरात पाच विद्यालयात ६ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या एका वर्षापासून या विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या या दुर्गंधीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या दुर्गंधीमुळे जेवण जेवायला होत नाही, अशीही तक्रारी या विद्यार्थ्यांच्या पालकांची आहे. अखेर एका वर्षांनी आज विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आज काढलेल्या या मोर्चांत पीपल्स विद्यालय, मुष्टीफंड विद्यालय, मेरी एमेक्युलेट, डॉ. हेडगेवार व सेव्हन व्हेंचर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवातील विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी मंदिरासमोर नाळर फोडला तसेच जामा मशीद व चर्चच्या ठिकाणी उदबत्ती व मेणबत्ती लावण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कचरा प्रश्न मिटवण्यासाठी महापालिकेला सद्बुद्धी द्यावी, अशी मागणी केली.
कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. सरकार ही जागा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरवा आहे, अशी अडचण यावेळी झालेल्या बैठकीत महापालिकेने शिक्षकांसमोर मांडली. या मुद्यावर शिक्षक आणि महापालिका याचे एकमत झाल्याने दोघांनी या विषयावर संघटितपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
काही विद्यार्थ्यांनी महापौराच्या कार्यालयात घुसून कचरा टाकल्याने महापौर टॉनी रोड्रीगीज यांनी खंत व्यक्त कली तर, विरोधी गटातील रुद्रेश चोडणकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

No comments: