Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 10 November, 2008

भारताचा दिग्विजय...

कांगारूंचा धुव्वा; गांगुलीला विजयी निरोप
नागपूर, दि. १० - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय संपादून मोठ्या जोशात मालिका २-० अशा फरकाने खिशात टाकली. त्याचबरोबर यजमानांनी झळाळत्या बॉर्डर-गावस्कर करंडकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोचला आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुलीची निवृत्तीही भारताने विजयी वातावरणात साजरी केली! "सामनावीर' पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा नवोदित गोलंदाज जेसन क्रेझा याने, तर मालिकावीर पुरस्कार उंचपुऱ्या ईशांत शर्माने पटकावला. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वार्थाने ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरला.
विजयी करंडक कर्णधार धोनीने माजी कर्णधार अनिल कुंबळेसह उंचावला. नागपूर येथे झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. भारताने हा सामना २७२ धावांनी जिंकला. भारताने पाहुण्यांना जिंकण्यासाठी ३८२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान कठीण असल्याने पाहुणे सामना वाचविण्याचाच प्रयत्न करतील असे वाटत होते. तथापि, आज सकाळी खेळ सुरू झाला तेव्हा कांगारूंची पळापळच सुरू झाली. पहिल्या सत्रात तीन महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर बाकीच्यांनीही नंतर तोच मार्ग अनुसरला. जगज्जेत्यांची बलवंत फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. उपाहारानंतर सुरू झालेल्या दुस-या सत्रात हरभजन आणि नवोदित अमित मिश्राने ऑस्ट्रेलियन खेळा़डूंना पळता भुई थोडी केली. मिश्राने याही सामन्यात चमक दाखवत पाच गडी बाद करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उर्वरित फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावण्याचेे इतिकर्तव्य पार पाडले आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
गेल्या सामन्यातील शतकवीर आज सकाळी कॅटिच फक्त १६ धावांवर ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देऊन बाद झाला. कर्णधार रिकी पॉंटींगही मिश्राच्या फेकीवर धावचीत झाला. मायकल क्लार्क २२ धावांवर ईशांतचाच बळी ठरला. त्याचा झेल धोनीने घेतला. मग पाहुण्यांच्या उर्वरित फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठविण्याची जबाबदारी मिश्रा व हरभजनने लीलया पेलली. मॅथ्यू हेडनला (७७) भज्जीनेे पायचीत पकडले. हेडनने ९३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एक षटकारच्या मदतीने ७७ धावा केल्या. माइक हसी वैयक्तिक १९ धावसंख्येवर बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने १११ धावा जमवून तीन गडी गमावले होते. ब्रॅड हॅडिन ४ धावांवर बाद झाला. शेन वॉटसनला (९) हरभजनने धोनीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अमित मिश्राने जेसन क्रेजाला (४) बाद करीत आठवा गडी तंबूत पाठवला. नंतर ब्रेट ली आणि मिशेल जॉन्सन यांना बाद करून हरभजनने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद ४४१
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद ३५५
भारत दुसरा डाव ः सर्वबाद २९५
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव
मॅथ्यू हेडन पायचीत गो. हरभजन सिंग ७७ (९३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार)
सायमन कॅटीच झे. महेंद्रसिंग धोनी गो. ईशांत शर्मा १६ (१६चेंडू, ३ चौकार)
रिकी पॉंटिंग धावबाद ८ ( ६चेंडू, २ चौकार), मायकेल क्लार्क झे. महेंद्रसिंग धोनी गो. ईशांत शर्मा २२ (३० चेंडू, ३ चौकार), मायकेल हसी झे. राहुल द्रविड़ गो. अमित मिश्रा १९ (३०चेंडू, २ चौकार) शेन वॉटसन झे. महेंद्रसिंग धोनी गो. हरभजन सिंग ९ (३४चेंडू), ब्रॅड हॅडिन झे. सचिन तेंडुलकर गो. अमित मिश्रा ४ (१०चेंडू), कॅमरुन व्हाईट नाबाद २६ (४९चेंडू, ३ चौकार), जेसन क्रेज्झा झे. महेंद्रसिंग धोनी गो. अमित मिश्रा ४ (१७ चेंडू), ब्रेट ली झे. मुरली विजय गो. हरभजन सिंग ० (३ चेंडू), मिचेल जॉन्सन पायचीत गो. हरभजन सिंग ११ १६चेंडू, १चौकार)
एकूण: २०९/१० (५०.२) धावगती : ४.१५
अवांतर : १३ (बाइज - ६, वाईड - ४, नोबॉल - २, लेग बाईज - १, दंड - ०)
गडी बाद होण्याचा क्रमः १-२९(५.४), २-३७(७.०), ३-८२(१५.५), ४-१५०(२८.४), ५-१५४(२९.२), ६-१६१(३२.४), ७-१७८(३८.४), ८-१९०(४३.५), ९-१९१(४४.४), १०-२०९(५०.२)
गोलंदाजी ः झहीर खान ८-०- ५७- ०, ईशांत शर्मा ९-०- ३१- २, हरभजन सिंग १८.२-२- ६४- ४, वीरेंद्र सेहवाग ४-०- २३- ०, अमित मिश्रा ११-२- २७- ३

No comments: