Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 November, 2008

दगडाने ठेचून महिलेचा खून

शिगाव कुळे येथे खळबळ
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी) - शिगाव वाकीकुयण (कुळे) येथील सरकारी विद्यालयाजवळ अंतर्गत रस्त्याच्या बाजूस एका महिलेचा सडलेला मृतदेह आज (दि.१२) दुपारी कुळे पोलिसांना सापडला. त्यामुळे खळबळ माजली आहे. मृत महिलेचा चेहरा दगडाने ठेचण्यात आल्यामुळे विद्रुप बनला असून हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची माहिती माजी सरपंच जयदेव वेळीप यांनी कुळे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठवला आहे. खून झालेल्या आलेल्या महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीसदरम्यान आहे. वाकीकुयण शिगाव येथे झाडा झुडपांनी वेढलेल्या भागात हा मृतदेह टाकण्यात आला आहे. दुर्गंधी आल्याने काही स्थानिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता मृतदेह असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली.
सदर अज्ञात महिलेचा चार - पाच दिवसांपूर्वी खून करून मृतदेह त्याठिकाणी टाकण्यात आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाच्या साह्याने ठेचण्यात आला आहे. त्यामुळे सदर महिलेची ओळख पटवणे कठीण बनले आहे. खून झालेल्या महिलेच्या अंगावर एकही वस्त्र ठेवण्यात आलेले नाही.
यापूर्वी नंद्रण मोले येथे दोघांना जिवंत जाळण्याची घटना घडलेली आहे. त्या प्रकरणाचा छडा लावण्यात कुळे पोलिसांना यश आलेले नाही. आता अज्ञात महिलेच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्याने लोकांत खळबळ माजली आहे. या खून प्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
फोंडा उपविभागीय पोलिस अधिकारी महेश गावकर, निरीक्षक मंजुनाथ देसाई, कुळ्याचे निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

No comments: