Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 12 November, 2008

चर्चिल, रेजिनाल्डभोवतीचे संकट गहिरे

"सेव्ह गोवा फ्रंट'च्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब
जुझे लोबो यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य
दिगंबर कामत सरकारपुढे नव्याने पेच

पणजी, डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी सेव्ह गोवा फं्रट पक्षातर्फे जुझे लोबो यांनी सादर केलेला उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी तथा डिचोलीचे उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनी ग्राह्य धरल्याने हा प्रादेशिक पक्ष अजूनही अस्तित्वात आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पक्षाचे दोन आमदार सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी दिगंबर कामत सरकारला पाठिंबा देताना हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन केल्याचा दावा त्यामुळे फोल ठरल्यात जमा आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी याच बेकायदेशीर विलीनीकरणावरून सभापती प्रतापसिंग राणे यांच्यासमोर दाखल केलेल्या अपात्रता याचिकेला बळकटी मिळाली असून पाळी पोटनिवडणुकीच्या तोंडावर कामत सरकारसमोर हा एक नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दोन वेळा कामत सरकारला जीवदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सभापती राणे यांच्याकडे आता तिसऱ्यांदा या सरकारच्या अस्तित्वाचा निकाल देण्याची सूत्रे हाती आल्याने सर्वांची नजर त्यांच्यावर खिळली आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक पेचप्रसंगावर "गोवादूत'नेच सर्वप्रथम प्रकाश टाकला होता.
पाळी पोटनिवडणुकीसाठी काल अर्जांची छाननी सुरू केली असता सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांच्या अर्जाला कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस व पक्षाचे सरचिटणीस सुरेश पिळर्णकर यांनी हरकत घेतली होती. या हरकतीच्या मुद्यावर काल निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांच्यासमोर बराच युक्तिवाद झाला. श्री. गावस व पिळर्णकर यांच्यावतीन चर्चिल यांचे राजकीय सल्लागार ऍड.माईक रॉड्रिगीस ऊर्फ माईक मेहता यांनी युक्तिवाद केला तर सेव्ह गोवाच्या वतीने ऍड. लवंदे यांनी काम पाहिले. जुझे लोबो यांच्या फॉर्म "ए' व "बी'वर पक्षाचे अध्यक्ष या नात्याने आंतोन गावकर यांनी केलेली सही बेकायदेशीर असून ते पक्षाचे अध्यक्ष नाही,अशी भूमिका ऍड.मेहता यांनी घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून पक्षाचे अध्यक्ष म्हणून सिद्धनाथ बुयांव यांच्या नावाची नोंद आहे. दरम्यान, ऍड.लवंदे यांनी आपल्या युक्तिवादात हा दावा फेटाळून लावला. मुख्य निवडणूक अधिकारी तथा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाळी पोटनिवडणुकीबाबत पाठवलेल्या पत्रांत आंतोन गावकर यांचा अध्यक्ष म्हणून केलेला उल्लेख त्यांचे पद सिद्ध करण्यास पुरेसे आहे असे सांगून विरोधकांनी केलेल्या दाव्यातील हवाच काढून घेतली. मुळातच या संपूर्ण सुनावणीतील महत्त्वाचा भाग म्हणजे पक्षाच्या अस्तित्वाबाबत युक्तिवाद न करता केवळ अध्यक्षपदावरून युक्तिवाद करीत आंतोन गावकर यांनी पक्षातर्फे पुढे केलेला उमेदवार ग्राह्य धरू नये,असाच पाठपुरावा प्रतिवादीतर्फे करण्यात आला होता. या युक्तीवादावेळी सुरेश पिळर्णकर यांनी स्वतः पक्षाचे अस्तित्व असल्याचे मान्य केल्याने "सेव्ह गोवा' उमेदवाराचे फावले. दरम्यान, याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षाच्या अस्तित्वाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली होती. यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक पक्ष म्हणून या राजकीय पक्षाची नोंदणी असल्याने या पक्षातर्फे सादर झालेला अर्ज ग्राह्य धरणे क्रमप्राप्त ठरते,असे म्हणून त्यांनी श्री.जुझे लोबो यांचा अर्ज मान्य केला आहे.

हा लोकांचा विजय ः आंतोन गावकर
मडगाव ः सेव्ह गोवा फ्रंटच्या उमेदवारांनी पाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्याची निवडणूक अधिकाऱ्यांची कृती म्हणजे सेव्ह गोवा फ्रंट अजून अस्तित्वात असल्याचे सिद्ध करणारा निर्णय आहे व हा लोकांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया फ्रंटचे अध्यक्ष आंतोन गावकर यांनी व्यक्त केली आहे.
या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाच्या अस्तित्वाबाबत आजवर घेतलेल्या परिश्रमाचे फळ देवाने आपणाला दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. एका विशिष्ट ध्येयवादी दृष्टीने स्थापन केलेल्या या पक्षाला आपल्या इच्छेनुसार नाचवण्याची कृती उघड झाली असून पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भावार्थ या निकालामुळे खरा ठरल्याचेही ते म्हणाले.श्री. पिळर्णकर व राऊल परेरा यांनी याप्रकरणी स्वतःचेच हसे करून घेतल्याचा टोला त्यांनी हाणला.
चर्चिल बुचकळ्यात
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण केलेले पक्षाचे विलीनीकरण हे कायदेशीर होते व त्याला कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सेव्हा गोवा फ्रंट पक्ष अजूनही अस्तित्वात आहे व मिकी पाशेको यांच्या याचिकेला त्यामुळे बळकटी मिळाली आहे याबाबत विचारले असता त्यांनी आपण याप्रकरणी आणखी बोलू इच्छित नाही,असे सांगितले.
आता सभापतींनी वेळ काढू नयेः मिकी
मंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी सेव्ह गोवा फ्रंट कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करून सरकारात सहभागी होण्याचा केलेला प्रकार हा पूर्णपणे बेकायदा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. हा पक्ष विलीन न होता अजूनही अस्तित्वात आहे हे पाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाल्याने सभापती प्रतापसिंग राणे यांनी आता अधिक वेळ न दवडता आपल्या याचिकेप्रकरणी तात्काळ निकाल द्यावा,असे पर्यटनमंत्री मिकी पाशेको म्हणाले. सध्या लंडनमध्ये असलेल्या मिकी यांनी सांगितले की, उभयतांनी केलेले विलीनीकरण नव्हे तर ते पक्षांतर आहे व सभापतींना त्याची दखल घेण्याची गरज आहे.

No comments: