Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 November, 2008

शाबा फळदेसाई अनंतात विलीन


कुडचडे, दि.१२ (प्रतिनिधी) - केप्याचे सुपुत्र, माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक तसेच विधानसभेचे माजी उपसभापती शाबा कृष्णा फळदेसाई (७८) यांचे काल ११ रोजी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, पुत्र संजय, कन्या डॉ. प्रसन्ना उर्फ गायत्री, सौ. मुग्धा असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात शाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केप्यात गावात १० डिसेंबर १९३१ रोजी जन्मलेले फळदेसाई हे गोव्याच्या मुक्तीलढ्यात सहभागी झाले. त्यात अनेकवेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी म.गो. पक्षातून १९६७ साली केपे मतदारसंघातून आमदारकीची सूत्रे सांभाळली. केपे भागातील ग्रामीण परिसराचा त्यांच्या कारकिर्दीत झपाट्याने विकास झाला. याच काळात त्यांनी केप्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते व मराठी शाळा सुरू करून साक्षरतेस सुरुवात केली. यावेळी केपे भागातील जनतेला राज्याच्या इतर भागाशी संपर्क साधणे सुलभ झाले.
शाबा दुसऱ्या विधानसभेच्या उपसभापतिपदाची सूत्रे सांभाळली. त्याशिवाय त्यांनी शेती व्यवसाय करून त्यामध्ये नवीन प्रयोग केले. मडगाव येथील लॉयला व हायस्कूलात व बाणावलीतील होली ट्रिनीटी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. शाबा फळदेसाई यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत संपूर्ण केपे भागातील विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या व हा मतदारसंघ गोव्यातील आदर्श बनवला.
आज दुपारी कुसमण केपे येथे त्यांच्या फार्म हाऊसच्या जागेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र अजय फळदेसाई (सागरी अभियंता) यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला. यावेळी स्थानिक आमदार बाबू कवळेकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुभाष फळदेसाई, शासनाच्या वतीने मामलेदार सुदिन नातू , नगराध्यक्षा श्रीमती लीडिया डीकॉस्टा, उपनगराध्यक्ष दयेश नाईक, माजी नगराध्यक्ष नाना गावकर, राहुल परेरा, ज्येष्ठ नागरिक पंढरी भिसो नाईक, ऍड. वल्लभ देसाई, ऍड. यतीन हेगडे देसाई, ऍड. पुरुषोत्तम फळदेसाई, व इतर मान्यवर उपस्थित होते.
केप्याला नवी दिशा दाखविणाऱ्या शाबा कृष्णा फळदेसाई हे केपे भागात त्यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे सदैव स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

No comments: