Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 November, 2008

मार्गारेट अल्वा यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. १२ - महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रभारी, महासचिव मार्गारेट अल्वा यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांना कॉंग्रेस कार्यकारिणीतील सर्व पदांवरून काढण्यात आले आहे. अल्वा या महाराष्ट्राच्याही प्रभारी होत्या. आता त्यांच्या जागी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ए.के.ऍण्टोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अल्वा यांच्याकडे कॉंग्रेसच्या महासचिव पदासोबतच महाराष्ट्रासह सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. मात्र, कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने पैसे घेऊन तिकीट विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार होती. त्यांचे प्रकरण पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानुसार सोमवारी अल्वा यांची पेशीही झाली. समितीतर्फे अल्वा यांच्यावर कारवाई होणारच, हे निश्चित मानले जात होते. पण, त्या कारवाईपूर्वीच त्यांनी महासचिव पदाचा राजीनामा दिला.
अल्वा यांनी राजीनामा दिला असला तरी त्या सामान्य कार्यकर्त्या म्हणून कार्यरत राहणार असल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्रासह ज्या राज्यांचे प्रभारीपद अल्वा यांच्याकडे होते त्या जागी पक्षाने तातडीने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, आता महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ए.के.ऍण्टोनी, हरियाणाचे मोतीलाल व्होरा, पंजाब आणि चंदीगडच्या मोहसीना किडवई, मेघालय, मिझोरम आणि नागालॅण्डचे काम ऑस्कर फर्नांडीस पाहणार आहेत.

No comments: