Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 10 November, 2008

रोहितला सशर्त जामीन

तपासकामी सहकार्य करण्याचे आदेश
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार व तिला अश्लील "एसएमएस' पाठवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केलेला मुख्य संशयित रोहित मोन्सेरात याला बाल न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला.
एक हमीदार व दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रोहित याची पोलिस कोठडीतून सुटका करण्यात आली. पोलिस तपासासाठी सहकार्याकरता रोहित याला तीन दिवस कळंगुट पोलिस स्थानकात प्रत्यक्ष हजर राहण्याचे तसेच सात दिवसांत पासपोर्ट न्यायालयात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच सदर पीडित मुलीच्या घराच्या परिसरातही जाऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.
न्यायाधीशांनी आपल्या आदेशाचे वाचन केले तेव्हा रोहितचे वडील तथा राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. आपल्या समर्थकांसह बाबूश मोन्सेरात बाल न्यायालयाच्या आवारात दुसऱ्या रांगेत बसले होते. न्यायालयाच्या आवारात आणि न्यायालयाबाहेर बाबूश समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र, जेनिफर मोन्सेरात यांची गैरहजेरी जाणवत होती.
"माझा मुलगा निरपराध असून आगामी काळात मी ते सिद्ध करेन', असे बाबूश यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या जर्मन महिलेने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेतल्याप्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता, "आपल्याला त्यावर काहीही बोलायचे नाही, असे बाबूश उत्तरले. "माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, असेही सांगण्यास ते विसरेल नाही. आज सकाळी कळंगुट पोलिस ९.४५ च्या सुमारास रोहितला घेऊन पाटो पणजी येथे "श्रमशक्ती भवना'च्या पहिल्या मजल्यावरील बाल न्यायालयात हजर झाले. त्यापूर्वीच बाबूश समर्थकांची गर्दी न्यायालयाबाहेर जमली होती.
दहा वाजता सदर जामीन अर्ज सुनावणीसाठी घेण्यात आला. त्यानंतर ठीक १० वाजून १५ मिनिटांनी न्यायाधीशांनी आपल्या आदेशाचे वाचन पूर्ण केले. त्यानंतर सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून रोहितला न्यायालयातून बाहेर जाण्याची अनुमती देण्यात आली. रोहित बाहेर येताच बाबूश यांनी त्याला जवळ घेतले आणि थेट आपल्या अलिशान वाहनात बसवून घर गाठले. याप्रसंगी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, उपमहापौर यतीन पारेख, नगरसेवक उदय मडकईकर, नागेश करिशेट्टी, कॅरोलिना पो न्यायालयात हजर होते. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून आपला मुलगा पोलिस कोठडीत असल्याने व्यथित झालेल्या जेनिफर मोन्सेरात यांचा रक्तदाब काल रात्री उतरल्याने त्यांना कांपाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज सकाळी रोहित याचा जामीन अर्ज सुनावणीसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री तक्रारदार जर्मन महिलेने आपण आपली तक्रार मागे घेत असल्याचे पत्र कळंगुट पोलिस स्थानकात पाठवले होते. यात तिने पोलिस चौकशी योग्य दिशेने केली जात नसल्याचा आरोप केला होता.तिचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनीही पोलिसांकडून पीडित मुलीला आरोपीसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे.

No comments: