Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 10 November, 2008

संगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्री किशोरी हळदणकर निवर्तल्या

माशेल, दि. ९ (प्रतिनिधी) - लोकनाट्यापासून संगीत व सामाजिक नाटकापर्यंत नाट्यप्रवास केलेल्या गोव्याच्या संगीत रंगभूमीवरील एक विख्यात अभिनेत्री किशोरी हळदणकर यांचे अल्प आजाराने, खांडोळा येथील त्यांच्या राहत्या घरी आज (रविवार दि. ९) पहाटे निधन झाले. त्या ७० वर्षाच्या होत्या.
बालपणापासून संगीताची हौस असल्याकारणाने गावातील गवळणकाला व जत्रेतील संगीत नाटकांत किशोरी हळदणकर यांनी भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर संगीत रंगभूमीवरील त्याच्या वावर कायम होत असतानाच वसंत आमोणकर, सखाराम बर्वे, मनोहरबुवा शिरगांवकर, तुकाराम फोंडेकर, तुळशीदास बोरकर, बाबी बोरकर आदी अनेक बुजुर्ग जाणकारांकडून त्यांना संगीतविषयक मार्गदर्शन लाभले,
"सैतानी पाश' या नाटकांत वसंत आमोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. सखाराम बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली "संशयकल्लोळ' मधील खेती व "स्वयंसेवक'मधील चिमणा या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी केल्या. कै. बर्वे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली येथेही त्यांना नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सवात "आरण्यक' या नाटकांतील त्यांनी सादर केलेल्या गांधीरीच्या भूमिकेसाठी आणि "शांतादुर्गा नाट्यमंडळ' डिचोली या संस्थेमार्फत सादर केलेल्या "जीवा शिवाची भेट' मधील रेणुका या भूमिकांसाठी त्यांना अभिनयाचे रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले होते. तातोबा वेलिंगकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक नाटकांतून पुरुष व स्त्री भूमिका साकार केल्या.
त्यांच्या रंगभूमीच्या दीर्घ सेवेबद्दल त्यांना गोवा सरकारचा "राज्य सांस्कृतिक पारितोषिक पुरस्कार' ( १९८२-८३), त्याचप्रमाणे "रंगदेवता रघुवीर सावकार पुरस्कार (१९९५)' प्रदान करून गौरविण्यात आले होते. गेल्या २७ मे २००८ रोजी माशेल येथील महाशाला कला संगम संस्थेतर्फे आयोजित संगीत संमेलनात त्यांना यंदाचा कला अकादमीचा "रंगसन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते.
संशय कल्लोळ, सौभद्र विद्याहरण, मृच्छकटिक, एकच प्याला, स्वयंवर, ययाती आणि देवयानी, करीन ती पूर्व, मत्स्यगंधा, मानापमान, जग काय म्हणेल, पंडितराज जगन्नाथ मेेनका, सत्तेचे गुलाम, अशा नाटकांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. या नाटकांतून मा. दत्ताराम, सुर्या वाघ, वसंत सावकारा विश्वनाथ नाईक, जयकृष्ण भाटिकर, डॉ. सावळो केणी, कृष्णा मोये, कीर्ती शिलेदार, नारायण बोडस, विश्वनाथ बागूल, जयश्री शेजवाडकर, शंकर घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर, मालती पेंढारकर, नयना आपटे आदी मातब्बर कलाकारांच्या बरोबरीने त्यांनी भूमिका केल्या होत्या.

No comments: