Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 July, 2008

अटकपूर्व जामिनासाठी नेर्लन आल्बुकर्कचा अर्ज

स्कार्लेट खून प्रकरण
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) : स्कार्लेट किलिंग या इंग्लंडमधील युवतीच्या खून प्रकरणी तपासकामात हलगर्जीपणा केल्याने बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक नेर्लन आल्बुकर्क याने अटकपूर्व जामिनासाठी बाल न्यायालयात आपल्या वकिलामार्फत अर्ज दाखल केल्याने या प्रकरणाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने "सीबीआय'च्या तपास अधिकाऱ्याला या अर्जावर युक्तिवादासाठी नोटीस बजावली असून पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.
१८ फेब्रुवारी ०८ रोजी स्कार्लेटचा मृतदेह हणजूण किनाऱ्यावर आढळला तेव्हा आल्बुकर्क ड्युटीवर होता. स्कार्लेटचा मृत्यू "अनैसर्गिक' म्हणून नोंद केल्यानंतर तिची आई फियोना हिने पोलिसांवर अनेक आरोप केले. त्यावेळी आपली बाजू जाणून न घेताच आपल्याला निलंबित करण्यात आले आणि त्यानंतर बडतर्फ करण्यात आल्याचे आल्बुकर्क याने अर्जात म्हटले आहे.
आपण या बडतर्फीला आव्हान देण्यासाठी याचिका तयार करण्याच्या कामात व्यस्त आहोत. तथापि, गेल्या काही दिवसांपासून "सीबीआय' माझ्या घरी संपर्क साधून आहे. त्यामुळे आपल्याला अटक होण्याची शक्यता त्याने अर्जात व्यक्त केली आहे.
तसेच, आपल्या कुटुंबातील एक सदस्य पोलिस खात्यात आहे. त्याने एका मंत्र्यांविरोधात तक्रार दाखल होती. त्याचा वचपा काढण्यासाठी आपला छळ केला जात असल्याचेही या अर्जात नमूद केले आहे. या अर्जावर सुनावणी सुरू झाल्यानंतर "सीबीआय' नेमकी कशासाठी त्याला अटक करण्याचा प्रयत्न करीत आहे, यावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान, केपे येथील दिनिज खून प्रकरणाचा तपास व्यवस्थितपणे न केल्याबद्दल यापूर्वी आल्बुकर्क याला निलंबित करण्यात आले होते. दिनिज याचा खून झालेला असताना तेव्हा आल्बुकर्क याने आत्महत्या अशी नोंद केली होती. त्यामुळे हे प्रकरण त्याच्यावर शेकले होते. पाठोपाठ तो स्कार्लेट खूनप्रकरणात तशाच स्वरूपाच्या कृतीमुळे अडचणीत आला. आता त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळे पुढे काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

No comments: