Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 July, 2008

अनैतिक प्रकरणातून पतीचा खून पत्नी अँजेलास जन्मठेप

मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधांतून मळकर्णे केपे येथे १६ डिसेंबर २००६ रोजी झालेल्या फ्लोरियान दिनिज याच्या खूनप्रकरणी आज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी मयताची पत्नी अँजेला दिनिज हिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
गेल्या आठवड्यात आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आज सकाळी भरगच्च न्यायालयात ही शिक्षा फर्मावण्यात आली. जन्मठेपेखेरीज आरोपीला १० हजार रु. दंड व तो न भरल्यास आणखी सहा महिने सक्त मजुरी, पुरावा नष्ट केल्याबद्दल २ वर्षें सक्तमजुरी व पाच हजार रु. दंड व तो न भरल्यास २ महिने सक्तमजुरी असे शिक्षेचे स्वरूप आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती मयताच्या वृद्ध आई-वडिलांना द्यावी, असे निकालपत्रात म्हटले आहे.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार अँजेलास आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने फ्लोरियानवर लाकडी दंडुक्यांनी हल्ला करून ठेचून खून केला होता व नंतर त्याने झाडाला डोके आपटून आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तथापि, नंतर तो खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाल्यावर तिला अटक झाली होती.
मयत फ्लोरियान हा विदेशात कामाला होता. दरम्यान, अँजेला व कार्मिन मास्कारेन्हस यांचे सूत जुळले. फ्लोरियानला गोव्यात आल्यावर ही गोष्ट कळली व पती - पत्नी यांच्यातील संबंध बिघडले. तो नेहमी दारूच्या नशेत राहू लागला. त्यातून त्यांची भांडणे होऊ लागली व तो त्यांना मारहाण करू लागला .
त्यामुळे अँजलाने पतीचा काटा काढण्याचा कट रचला त्यात आपला १७ वर्षीय मुलगा जेम्स याला सामील करून घेतले व हे अतिरेकी पाऊल उचलले .
प्रथम केप्याचे तत्कालीन उपनिरीक्षक (व आता स्कार्लेट प्रकरणी बडर्फ करण्यात आलेले) नेर्लन आल्बुकर्क यांनी याप्रकरणी तेव्हा आत्महत्या म्हणून नोंद केली. मात्र मयताच्या बहिणीने प्रकरण लावून धरले व त्यामुळे मयताचा पुरलेला मृतदेह काढून त्याची शवचिकित्सा केली असता तो खून असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपासकाम कुंकळ्ळीचे तत्कालीन पोलिस निरिक्षक मंजुनाथ देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी अँजेलाला मुलासह अटक केली. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला "अपनाघर'मध्ये पाठविले होते तो अजून तेथेच आहे. या प्रकरणात आरोपीच्यावतीने ऍड. आल्बन व्हिएगस यांनी तर सरकारच्या वतीने सरोजनी सादिर्र्न यांनी काम पाहिले.

No comments: