Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 July, 2008

चार बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

दवर्ली -दिकरपाल पंचायतीची कारवाई
मडगाव, दि. 16 (प्रतिनिधी) - दवर्ली-दिकरपाल पंचायतीने आज अनपेक्षितपणे धडक कारवाई करून दवर्ली मशिदीजवळील कोमुनिदाद जमिनीत उभी राहिलेली एक चाळ व तीन पक्की बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. मडगावात सध्या विविध सरकारी यंत्रणांनी हाती घेतलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या या कारवाईला महत्त्व दिले जाते.
सरपंच मार्टिन रोशा यांच्यासह सर्व 11 पंचायत सदस्य या कारवाईवेळी हजर होते. त्यांनी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईला पाठिंबा दिला. मात्र या बांधकामालगतच उभ्या राहिलेल्या अन्य बेकायदा बांधकामांकडे पंचायतीने दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल लोकांनी उपस्थित केला.
बुलडोझरची मदत घेऊन पाडलेल्या या बांधकामांत एक पक्की चाळ व तीन घरे होती . त्यापैकी एका घरात दुकानही सुरू करण्यात आले होते. पंचायत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हबीब नामक इसमाने ही बांधकामे केल्याचे आढळल्यावर त्याच्या नावे तीनदा नोटिसा पाठविण्यात आल्या; पण त्या कोणीच न घेतल्या नाहीत. ती जमीन कोमुनिदादीची असल्याने तेथे संबंधितांशी संपर्क साधण्यात आला. तुम्ही कोणाला बांधकामास परवानगी दिली आहे काय याची चौकशी केली असता नकारार्थी उत्तर त्यांच्याकडून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी, मामलेदार, गटविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन ही मोहीम आखण्यात आली .
आजच्या कारवाईवेळी शासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने पोलिस हजर होते. गेल्या काही दिवसांतील मडगावातील घटना व त्यात समाजविघातक शक्तींचा हात असल्याच्या शक्यतेनंतर अशा बांधकामांबाबत पंचायतींकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत . आजच्या कारवाईमुळे दवर्ली तसेच रुमडामळ पंचायत क्षेत्रांत नियम धाब्यावर बसवून बांधकामे केलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

No comments: