Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 July, 2008

छोट्या माशांचा 'भाव' वधारला

- सोरेन यांना मंत्रिपद शक्य,
- लखनौ विमानतळाला चरणसिंग यांचे नाव
- अणुकरार होणारच; सोनिया यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, दि. १७ : येत्या मंगळवारी केंद्रातील संयुक्त पुरोगमी आघाडीचे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असून या सरकारला बहुमतासाठी २७१ मतांचा जादुई आकडा गाठणे अत्यंत निकडीचे बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांना मंत्रिपदाचे गाजर कॉंग्रेसकडून दाखवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच लखनौ विमानतळाचे चौधरी चरणसिंग विमानतळ असे नामकरण करून संपुआने राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग यांच्या पाठिंब्याची तजवीज करण्यासाठीही धडपड सुरू केली आहे.
सध्याच्या स्थितीत मिळतील तेथून खासदार जमवण्यासाठी संपुआने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिबू सोरेन यांना मंत्रिपद हा त्याचाच एक भाग मानला जातो. या पक्षाचे पाच खासदार असून त्यांनी जर संपुआच्या बाजूने मंगळवारी मतदान केले तर त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारला मोठाच दिलासा मिळू शकतो. मात्र सोरेन यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. जर त्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले तर त्यांचे झारखंडमधील सरकार कॉंग्रेसकडून खाली खेचले जाईल. कारण या सरकारला कॉंग्रेसने टेकू दिला आहे. तथापि, तशा परिस्थिती भारतीय जनता पक्षाकडून सोरेन यांना मदत मिळू शकते. एवढेच नव्हे तर भाजपच्या आधारे ते झारखंडचे मुख्यमंत्रिदेखील होऊ शकतात. दुसरीकडे अजितसिंग यांना खूष करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून लखनौ विमानतळाला चौधरी चरणसिंग यांचे नाव देण्यात आले आहे. अजितसिंग यांच्याकडे तीन खासदार आहेत. लोकसभेत ते संपुआसाठी येत्या मंगळवारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. मात्र, अजितसिंग यांनी अजून आपले पत्ते खोललेले नाहीत. त्यांनी संपुआला पाठिंब्याबद्दल मौनव्रत धारण केले आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. वर्धन यांनी त्यांची भेट घेतली तेव्हासुद्धा त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. तथापि, एकूण रागरंग लक्षात घेता अजितसिंग आपल्या तीन खासदारांसह केंद्राच्या मदतीला धावून जातील, असे चित्र दिसून येते.
अणुकरार होणारच ः सोनिया
आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे राजीव आरोग्यश्री योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करताना संपुआच्या अध्यश्र श्रीमती सोनिया गांधी यांनी, कोणत्याही स्थितीत आपले सरकार अणुकरार केल्याखेरीज राहणार नाही, असे सांगितले. हा करार देशहिताचा असल्याचा दावा त्यांनी केला.
बंदीवान पप्पू यादवला
मतदानासाठी परवानगी

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचा खासदार पप्पू यादव याला लोकसभेत २२ जुलैला होणाऱ्या विश्वासदर्शक मतात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. यादव याला १४ जून १९९८ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार अजित सरकार यांच्या हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले होते. पप्पू यादवला यापूर्वीही न्यायालयाने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदानाची अनुमती न्यायालयाने यापूर्वी दिली होती. मात्र त्याच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्याचे आदेशही तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. राजेश रंजन उर्फ पप्पू यादव फेब्रुवारी २००५ पासून तिहार तुरुंगात बंदी आहे.

No comments: