Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 July, 2008

चंद्राबाबूंची मायावतींशी चर्चा

तिसऱ्या आघाडीला नव्याने चालना
करात-मायावती यांची सल्लामसलत

नवी दिल्ली, दि. 13 ः केंद्रातील मनमोहनसिंग सरकार येत्या 21 रोजी विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग धारण केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी आज बसप नेत्या व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची भेट घेऊन चर्चा केली व सरकारविरोधात डाव्यांसोबत "बसप'ही मतदान करील, असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मायावती यांनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधल्याने आता तिसऱ्या आघाडीत बसप सहभागी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुलायमसिंग यांच्या "सप'ने तिसऱ्या आघाडीला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसचे समर्थन करायचे ठरविल्याने आता त्या जागी बसपला स्थान देण्यास चंद्राबाबू प्रयत्नशील असून त्याच दृष्टीने आपण मायावतींशी बोलणी केल्याचे त्यांनी उघड केले.
प्रकाश करात यांनी आज अणुकराराच्या मुद्यावर उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी अणुकराराच्या मुद्यावर मायावती आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.आज मायावती यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कारत म्हणाले की, अणुकरारावर 22 जुलै रोजी संसदेत मतदान होणार आहे. डावे पक्ष या कराराच्या विरोधात मतदान करणार असून मायावतींनीही आमच्या धोरणांना पाठिंबा दिला आहे. आम्हाला त्यांच्या भावनांविषयी आदर आहे आणि अणुकराराविरोधातील आमच्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
अणुकराराच्या मुद्यावर डाव्यांनी समर्थन काढून घेतल्यानंतर संपुआ सरकार अल्पमतात आले आहे. 22 जुलै रोजी सरकारचे शक्तिपरीक्षण होणार आहे. त्यासाठी आता कॉंग्रेस आणि डावे हे दोघेही आपआपल्या समर्थकांच्या शोधार्थ निघाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज करात यांनी मायावतींची भेेट घेतली.
केवळ विश्वासदर्शक ठरावावेळीच नव्हे तर आगामी निवडणुकीत डाव्या पक्षांनी तिसऱ्या आघाडीचे सहकार्य घेण्याचे निश्चित केले असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठीच करात यांनी मायावती यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंद्राबाबू यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, असे मानले जाते. सीबीआयचा ससेमिरा आपल्यामागे लावण्यासाठी "सप'ने आपल्या पाठिंब्याच्या बदल्यात केंद्रावर दडपण आणल्याचा आरोप पुन्हा आज मायावती यांनी केला व अन्य पक्षांचे सहकार्य आपल्याला अपेक्षित असल्याचे सांगितले.
बिनहिशेबी अफाट संपत्तीप्रकरणी मायावती यांच्याविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली असून, न्यायालयाची संमती मागितली आहे.

No comments: