Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 July, 2008

मेरशी झोपडपट्टीवर छाप्यात 31 जण पोलिसांच्या ताब्यात

पणजी, दि. 13 (प्रतिनिधी) - मडगाव येथे जातीय तणाव झाल्यानंतर मुस्लिमाच्या एका गटाकडे मोठ्या प्रमाणात हत्यारे सापडल्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री मेरशी चिंबल येथील इंदिरानगरमध्ये पोलिसांनी केलेल्या "शोध मोहिमे'मध्ये 31 जणांना ताब्यात घेण्यात आले. या 31 व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून आज सकाळी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या हमीवर सुटका केली. काल रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत हे मोहीम सुरू होती.
मडगाव येथे मोठ्या प्रमाणात हत्यारे सापडल्याने या झोपडपट्टीत छापा टाकण्याचा उद्देश होता, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने सांगितले. परंतु, पोलिसांच्या हाती शस्त्रे लागली नसली तरी, या कारवाईत घरफोडी व अन्य चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपविभागीय उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे व जुने गोवे पोलिस स्थानकाचे गुरुदास गावडे यांच्यासह उपनिरीक्षक राहुल परब, अर्जुन कोंडूसकर, श्री. हंसकुट्टी व अन्य शंभर पोलिसांनी या कॉबिंग ऑपरेशन भाग घेतला.
काल रात्री शंभर पोलिसांनी अचानक या झोपडपट्टीवर घातलेल्या छाप्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मडगाव येथे हत्यारे सापडल्याने अशाच प्रकारे अन्य ठिकाणी हत्यारे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री घातलेल्या या छाप्यात पोलिसांनी प्रत्येकाला उठवून रेशन कार्ड आणि मतदार ओळख पत्र तपासून पाहिले. तसेच घरात झोपलेल्या व्यक्तींची नावे रेशनकार्डवर आहे, की नाही याचीही यावेळी चौकशी करण्यात आली. रेशनकार्डवर नाव आणि मतदार ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रात्रभर कसून चौकशी केली.
कालच्या या पोलिसांच्या कारवाईमुळे या झोपडपट्टीत अनेक विगरगोमंतकीय बेकायदा वास्तव्य करून असल्याचे उघड झाले आहे. काल यांना अटक केल्यानंतर मामी गटातील जगन्नाथ भद्रीनाथ तमय्या या पंच सदस्याने सुमारे आठ जणांना जामिनावर मुक्त केले.
गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीवरील नावांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना या झोपडपट्टीत प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. तर काहींना हाकलून लावण्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी बाबूश गट आणि मामी गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

No comments: