Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 July, 2008

गोव्यातही कॉंग्रेसची झोप उडवण्याचे सत्र

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) : केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला डाव्यांनी ज्याप्रमाणे हैराण केले आहे त्या धर्तीवरच गोव्यातील दिगंबर कामत सरकारला पाठिंबा देणाऱ्या गटांकडून सध्या कॉंग्रेसची झोप उडवण्याचे सत्र सुरू झाले आहे. केंद्रात २२ रोजी विश्वासमत ठरावाचा निकाल हाच मुळी गोव्यातील नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरणार असल्याचा गौप्यस्फोट सत्ताधारी पक्षातीलच एका नेत्याने करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाळीचे आमदार प्रा. गुरूदास गावस यांचे निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पाळी मतदारसंघाचे पालकमंत्री या नात्याने या मतदारसंघाची सूत्रे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सध्या आपल्या हातात घेतली आहेत. प्रा. गावस हे विश्वजित राणे यांचे समर्थक होते हे जगजाहीर असल्याने पाळी मतदारसंघात विश्वजित यांचाच शब्द अखेरचा मानण्याची वेळ प्रदेश कॉंग्रेसवर आली आहे. कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात उत्तर गोव्यातील काही पराभूत उमेदवारांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. विश्वजित यांच्या कृपाशिर्वादाने ही उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा दावा करून अनेकांनी उमेदवारीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यधांकडे धाव घेण्याचे सोडून विश्वजित राणे यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केल्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेससाठी उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत जितेंद्र देशप्रभू,ऍड.रमाकांत खलप या दिग्गजांचा नावांचीही चर्चा सुरू असून त्यांनी आपल्या काही समर्थकांकरवी आपले घोडे पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
सध्या पाळी मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्याची शक्यता असलेल्या सदस्यांत स्व. गावस यांचे बंधू प्रताप गावस, साखळीच्या नगरसेवक सुनिता वेरेकर, महेश गांवस यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विश्वजित राणे पाळी मतदारसंघातून आपली पत्नी दिव्या राणे यांना उतरवण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांचे समर्थक आता उघडपणे सांगत आहेत.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांच्यासह मंगलदास गावस व डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची मदार विश्वजित राणे यांच्या बळावर असल्याने पाळी मतदारसंघात कॉंग्रेसने सध्या त्यांच्यासमोर नांगी टाकली आहे. या मतदारसंघाबाबत निर्णय विश्वजित राणेच घेतील, असे कॉंग्रेसवालेच सांगत आहेत. पाळी मतदारसंघातून विश्वजित यांचा उमेदवार कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असला तरी त्यांच्या इच्छेच्या उमेदवारीला जर श्रेष्ठींनी परवानगी दिली नाही तर ते आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळाली आहे. मगो पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेले महेश गांवस हेही सध्याच्या स्थितीत कॉंग्रेस किंवा मगोची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मगो पक्ष सध्याच्या सरकारात सहभागी झाल्याने मगो या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सुदिन ढवळीकरांमार्फत विश्वजित यांच्याकरवी कॉंग्रेसचे तिकीट मिळवण्याचे प्रयत्नही त्यांनी चालवल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. दरम्यान, समीर साळगावकर यांची अलीकडेच गोवा हस्तकला विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर विश्वजित राणे यांना त्यांना आक्षेप घेतल्याची चर्चा होती. विश्वजित यांनी यापूर्वी काही खाण उद्योजकांबरोबर दोन हात करून त्याबाबत मुख्य सचिव जे.पी. सिंग यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांचा रोष साळगावकरांच्या दिशेने होता व त्यामुळे अनिल साळगावकर यांच्यातर्फे त्यांचे निकटवर्तीय असलेल्या महेश गांवस यांना विश्वजित यांच्या उमेदवाराविरोधात उतरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची नवी वार्ता सध्या पाळीत पसरली आहे.
------------------------------------------------------------------------------
भाजपचा सावध पवित्रा
सध्याच्या परिस्थितीत भाजपने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. ऑगस्टमध्ये विधानसभा अधिवेशन असल्याने केंद्रातील "संपुआ'सरकार कोसळले तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचीच जास्त शक्यता असल्याने एवढ्यातच पाळी मतदारसंघाबाबत भूमिका घेणे उचित नाही, त्याबाबत नंतर विचार करू,असे एका नेत्याचे म्हणणे आहे.
------------------------------------------------------------------------------

No comments: