Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 July, 2008

एका खासदारासाठी पंचवीस कोटी रुपये!

डाव्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू
नवी दिल्ली, दि. 14 ः भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. वर्धन यांनी, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील संपुआ सरकार स्वतःची सत्ता राखण्यासाठी खासदार खरेदी करू लागल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदाराचा दर 25 कोटी रुपये एवढा आहे, असे त्यांनी येथे एका सभेत सांगितले. कोणाजवळच आता तत्त्वे राहिली नाहीत. खासदार खरेदीसाठी आता काही कोटीच नव्हे, तर तब्बल 25 कोटी दिले जात आहेत. माझ्या आयुष्यात मी कधी 25 कोटी बघितलेले नाहीत. मला आशा आहे की सभेला उपस्थित असलेल्यांपैकीही कोणी एवढी रक्कम पाहिलेली नसेल.
एवढेच नाही तर आपली सत्ता हातून जाऊ नये यासाठी खुनाच्या आरोपाखाली देशाच्या विविध कारागृहांत बंदिस्त असलेल्या खासदारांना मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न या सरकारने सुरू केले आहेत. संपुआ सरकार किती खालच्या पातळीला गेले आहे हेच यावरून दिसून येते याकडे वर्धन यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, अमेरिकेला दिलेल्या वचनाची पूर्तता सरकार करीत आहे, असा सणसणीत आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी आज येथे एका जाहीर सभेत केला. अमेरिकेबरोबर करण्यात आलेल्या अणुकरारावरून कॉंगे्रस पक्षाच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारविरुद्ध डाव्या पक्षांनी आज देशव्यापी आंदोलन सुरू केले. राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत कारत बोलत होते.
केंद्रातील सरकार देशातील जनतेच्या विरोधात कार्य करीत आहे. सर्वसामान्य जनतेवर महागाई व कराराचा बोजा टाकत आहे. देशहिताच्या विरोधात असलेला हा करार स्वीकारू नका असे आम्ही या सरकारला वारंवार सांगूनही केेवळ आंधळ्या अमेरिका प्रेमापोटी हा करार करीत आहे.
कराराचे समर्थन करताना सरकार म्हणत आहे की यामुळे देशाला स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल. परंतु आम्ही जनतेला येथे सावध करू इच्छितो की, समजा हा करार झाला तर अमेरिकन अणु वीज प्रकल्प उभारणे फार महागात पडेल. यामुळे विजेचे उत्पादन महाग होईल. आज कोळशामुळे आपल्याला जी वीज केेेवळ 2.50 रु. दराने प्राप्त होत आहे ती करारानंतर 5.50 रुपयेपर्यंत पोेेहचेल.
देशाचे स्वतंत्र परराष्ट्र, तसेच अलिप्तता धोरण गुंडाळून ठेवीत या सरकारने आता अमेरिकेचा हात धरला आहे. हे सरकार देशाला गुलामीकडे ढकलत आहे. अणुकरारानंतर आपल्या देशाला अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचावे लागेल, असा आरोप कारत यांनी यावेळी केला. जनतेला काय त्रास होत आहे याच्याशी या सरकारला काहीएक घेणेदेणे दिसत नाही. या सरकारला चिंता आहे ती केवळ अमेरिकेबरोबर करण्यात आलेल्या अणुकराराची.
महागाई प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे जनता फार हवालदिल झाली आहे. परंतु, संपुआ सरकार मात्र अमेरिकेची स्तुती करण्यात मग्न आहे. एवढेच नाही तर आपली सत्ता टिकून राहावी यासाठी बहुमत कसे प्राप्त करता येईल याचीच चिंता या सरकारला लागून आहे. बहुमत सिध्द करून दाखविण्यासाठी आतातर खासदार खरेदी सुरू झाली आहे, असा आरोप प्रकाश कारत यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही किमान समान कार्यक्रमांतर्गत या सरकारला पाठिंबा दिला होता. या कार्यक्रमांतर्गत देशाचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र राहील, असे म्हटले होते. अमेरिकेबरोबर युती करण्याचा त्यात उल्लेख करण्यात आला नव्हता. परंतु अणुकराराच्या संदर्भात या सरकारने किमान समान कार्यक्रमाला खुंटीला टांगून ठेवले आहे. संपुआ सरकार टिकून राहावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. या करारात काय धोके आहेत याची कल्पना आम्ही सरकारला दिली होती. पण एवढे केल्यानंतरही सरकार अमेरिकेच्याच दबावाखाली आले, असा आरोप कारत यांनी केला.
या सरकारने अमेरिकन गुंतवणुकीला आपल्या देशाची दारे खुली करून दिली. कृषी, बॅंक, विमा व शिक्षणासह अनेक क्षेत्रांत या सरकारने चतुराईने विदेशी गुंतवणुकीला येऊ दिले. आज भारतीय अर्थव्यवस्थेवर विदेशी अर्थनीतीचा दबाव आहे.
महागाईच्या मुद्यावर मनमोहनसिंग सरकारवर जोरदार हल्ला करताना डाव्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे की, केंद्रातील संपुआ सरकारने चुकीच्या आर्थिक धोरणांना जवळ केले आहे. त्यामुळे आज महागाईचा दर 12 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अणुकराराऐवजी सरकारने महागाई कशाप्रकारे नियंत्रणात आणता येईल याचा विचार करावा, असे सांगून महागाई आटोक्यात आणण्यासाठी आम्ही पाच उपायही सुचविले होते. परंतु याकडे लक्ष न देता या सरकारने आपले सारे लक्ष अमेरिकेबरोबर करण्यात आलेल्या अणुकरारावर केंद्रित केले.

No comments: