Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 3 March, 2008

कोळसाप्रकरणी युवक कॉंग्रेसची
उपसभापती व मंत्र्यांविरुद्ध भूमिका

वास्को, दि. 2 (प्रतिनिधी) ः प्रदूषणामुळे वास्को शहर आरोग्यास धोकादायक असल्याचे कारण पुढे करून आंदोलन करणाऱ्या मुरगाव बचाव आंदोलच्या नेत्यांनी केवळ आपला स्वार्थ साधल्याचा आरोप आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रोजगार बचाव अभियानाने केला. या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून युवक कॉंग्रेस नेत्यांनी उपसभापती माविन गुदिन्हो व मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली.
धक्का क्रमांक 10 व 11 वरील कोळसा उलाढाल बंद केली जात असेल तर मग 5 व 6 क्रमांकांच्या धक्क्यांवरील कोळसा उलाढाल बंद करा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. रोजगार बचाव आंदोलनाने मुरगाव बचाव अभियानाच्याविरोधात उघडलेल्या या आघाडीला आता युवक कॉंग्रेस अध्यक्ष संकल्प आमोणकर व नगरसेवक रोहिणी परब, शांती मांद्रेकर, किशोरी हळदणकर, सेबी डिसोझा व शेखर खडपकर यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. धक्का क्रमांक 10 व 11 वर कोळशाची उलाढाल होत राहिल्यास सडा भागात प्रदूषण होईल, असे सांगून आमोणकर यांनी गोमंतकीय कामगारांना डावलले जात असल्याचा आरोप केला. मुरगाव बचाव अभियानाने हजारो गोमंतकीयांचा रोजगार हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मुरगाव बचाव अभियानाने एमपीटीशी केलेला करार जनहिताचा नसल्याची टीका त्यांनी केली. उपसभापती माविन गुदिन्हो, मंत्री जुझे फिलीप डिसोझा व आमदार मिलींद नाईक यांना आपली चूक आता समजून येईल, असे आमोणकर यांनी सांगितले.
मुरगाव बचाव अभियानाने मूळ मागण्यांवर भर दिला नाही, अशी टीका आत्तापर्यंत त्या संघटनेचे समर्थन करणारे नगरसेवक शेखर खडपकर यांनी केली. कोळसा उलाढाल पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. लिओनार्द रॉड्रीगीस यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवले जाईल असे सांगितले.

No comments: