Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 March, 2008

पणजीत तीन रस्त्यांवर पे पार्किंग?

महापालिका बैठकीत निर्णय
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)ः महात्मा गांधी, आत्माराम बोरकर व १७ जून मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर पे पार्किंग करणे, नॅशनल सिनेमागृह ताब्यात घेणे, दोनापावला जेटीवरील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे, मिरामार ते दोनापावलापर्यंतचा रस्ता तिपदरी करणे, नव्या बाजार संकुलातील दुकानदारांना भाडे लागू करणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय आज पणजी महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आले. विरोधकांनी मात्र या बैठकीवर बहिष्कार घातला.
महापौर टोनी रॉड्रिगिस यांची प्रकृती अचानक बिघडल्याने यतीन पारेख यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे कामकाज सुरू करण्यात आले. सायकलवरून मासे विक्री करणाऱ्यांवर पालिकेने कोणती कारवाई केली, हा मुद्दा उपस्थित करून विरोधी गटातील सुरेंद्र फुर्तादो यांनी हंगामी महापौर पारेख व आयुक्त गडकरी यांना अडचणीत आणल्याने सत्ताधारी त्यांच्यावर तुटून पडले. सायकलवरून मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा ठराव समंत करण्यात आला होता. परंतु, या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप विरोधकांनी बराच ताणला. तसेच बाजार समितीतील काही सदस्यांनी करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करून त्यांची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी फुर्तादो यांनी यावेळी केली. १६ व १७ प्रभागांत विकासकामे करण्यासाठी उदय मडकईकर यांना १.३ कोटी रुपये देण्यात आले असून फक्त या दोन प्रभागांना एवढी रक्कम का देण्यात आली, असा प्रश्न यावेळी मिनीन डिक्रुज यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. महापालिकेत मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू असून ही सगळी "लूटमारीची कंपनी' असल्याची टीका यावेळी फुर्तादो यांनी केली.
येत्या काही दिवसांत पणजीतील तीन रस्त्यांवर पे पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. पारेख यांनी सांगितले. एम. जी., आत्माराम बोरकर मार्ग व १७ जून रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर पे पार्किंग केले जाणार आहे. या मार्गावर असलेल्या दुकानदारांना तसेच रहिवाशीयांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी "पास' दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नॅशनल सिनेमागृहाच्या जागेचा भाडे करार संपुष्टात आल्याने ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर प्रकल्प उभारला जाणार असून हा प्रकल्प कोणता असावा, यासाठी खास सल्लागार नेमला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या बाजार संकुलात असलेल्या गाळेधारकांना भाडे सुरू करण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी गटातच बरीच खडाजंगी उडाली. यात नगरसेवक उदय मडकईकर आणि स्वीकृत नगरसेवक दया कारापूरकर यांच्यात बरीच जुंपली. यावेळी दोघांनीही आरोपप्रत्यारोप करताना दोघांनीही दोघांचीही गुपिते चव्हाट्यावर आणली. नव्या बाजार संकुलाची जागा सरकार, औद्योगिक विकास महामंडळ व महापालिकेच्या मालकीची असल्याने फक्त महापालिकाच हे भाडे ठरवू शकत नसल्याचा मुद्दा यावेळी दया कारापूरकर यांनी उपस्थित केला. यामुळे नगरसेवक उदय मडकईकर यांनी दर महिन्याला पालिकेला नव्या बाजार संकुलात पाणी व वीज बिल भरण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च करावे लागत असल्याने त्वरित गाळेधारकांना भाडे लागू करण्याची मागणी केली. गेल्या तीन वर्षांपासून गाळेधारकांनी कोणतेही भाडे दिले नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याबाबत तीन सरकारी यंत्रणा गुंतलेल्या असल्याने कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर पारेख यांनी सांगितले.
दोनापावला जेटीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर फेरीवाल्यांना याच ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचा ठराव आज घेण्यात आला. या ठिकाणी सुमारे ५६ फेरीवाले असल्याची माहिती महापौर पारेख यांनी दिली. तसेच मिरामार ते दोनापावला हा रस्ता तीन पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
----------------------------------
नगरसेवकांकडून वसुली
काही महिन्यांपूर्वी जयपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेल्याचे भासवून सत्ताधारी गटातील चार नगरसेविकांनी पन्नास हजार रुपये खर्च केल्याने त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात आल्याचे महापौर पारेख यांनी सांगितले. या विषयीचा प्रश्न नगरसेविका वैदही नाईक यांनी उपस्थित केला होता.
-----------------------------------

No comments: