Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 5 March 2008

शालांत मंडळ अध्यक्ष संकटात!

निकालपत्रिकेतील फेरफाराच्या चौकशीची मागणी
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांच्या आदेशावरून मडगाव येथील इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला खास सरपरीक्षक पाठवून उत्तीर्ण करण्याचा प्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा अ. गो. उच्च माध्यमिक प्राचार्य मंच व इतर संघटनांनी दिला आहे.
या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा चंग उच्च माध्यमिक प्राचार्य मंच, गोवा मुख्याध्यापक संघटना व फोंडा विद्यालय संघटनेने बांधला आहे. एका विद्यार्थ्यासाठी संपूर्ण शिक्षण यंत्रणाच वेठीस धरण्याचा हा प्रकार गंभीर असून त्याचा भांडाफोड झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संघटनेचे माजी अध्यक्ष नारायण देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीचे निवेदन शिक्षण संचालक व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आज देण्यात आले. अत्यंत गंभीर व शिक्षण खात्यातील गैरकारभार वेशीवर टांगणारे हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. एका विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शिक्षण यंत्रणाच वेठीस धरण्याची ही कृती निषेधार्ह असून अकरावीत नापास झालेल्या अन्य हजारो विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय असल्याची टीका मंचातर्फे करण्यात आली आहे.
यासंबंधी अनेकवेळा मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेस आला असता त्याला पद्धतशीरपणे बगल देण्यात येत होती. या बैठकीत श्री. फर्नांडिस यांनी चक्क हा विषय शिक्षण संचालकांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच आज मुद्दामहून शिक्षण संचालकांना एक खास निवेदन प्रदान करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, बोर्डा मडगाव येथील मल्टीपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेत मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी फर्नांडिस यांच्या आदेशावरून फेरफार करण्यात आली. श्री. फर्नांडिस यांनी १७ एप्रिल ०७ रोजी सदर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याचा अकरावीचा निकाल स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. या निकालाची नव्याने तपासणी करण्यासाठी खास मंडळाकडून परीक्षक पाठवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मंडळाला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालात बदल करण्याचा कोणताही हक्क नसताना श्री.फर्नांडिस यांनी खास आपल्या पदाचा वापर करून सदर मुलाच्या निकालपत्रात फेरफार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १६ मे ०७ रोजी नावेली साखळी सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. व्ही. एस. सुब्बाराव यांना सदर विद्यार्थ्याचे पेपर नव्याने तपासण्यासाठी पाठवण्यात आले. "एनसीईआरटी" अभ्यासक्रमाची माहिती नसलेल्या सुब्बाराव यांनी सदर विद्यार्थ्यांचे संपूर्ण पेपर नव्याने तपासून त्यात त्याला पास करण्यासाठी संपूर्ण फेरफार केली. या निकालाबाबत आपले मतप्रदर्शन करताना सदर विद्यार्थ्याला बारावी इयत्तेत अन्य शाखेत प्रवेश देण्याचा सल्ला दिला.
सध्या हा विद्यार्थी अन्य एका उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य शाखेत बारावी शिकत असून तो आता यंदा बारावीची परीक्षाही देणार आहे. शिक्षण खात्याला सध्या कोणीही वाली नसल्याने या गंभीर विषयाकडे कुणीच लक्ष देत नसल्याची तक्रार मंचाने केली आहे.

No comments: