Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 March, 2008

भारतासाठी हेरगिरी करीत होतोः काश्मीर सिंग

सरकारने कुटुंबाची काळजी घेतली नाही
चंदीगड, दि. ७ ः ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानी कारागृहातून भारतात परतलेल्या काश्मीर सिंग यांनी त्यावेळी भारतासाठी पाकमध्ये हेरगिरी केल्याचे कबूल केले असून देशासाठी केलेल्या माझ्या कामाची दखल तत्कालीन भारत सरकारने न घेतल्याने कुटुंबीयांचे अतोनात हाल झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना काश्मीर सिंग यांच्यासह त्यांच्या पत्नी परमजीत कौरही उपस्थित होत्या. काश्मीर सिंग म्हणाले की, मला हेर म्हणून जे काम सोपविण्यात आले होते ते काम मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण, मला १९७४ मध्ये अटक झाली त्यावेळी भारतात सत्तेवर असणाऱ्या सरकारने माझ्या कुटुंबाची साधी दखलही घेतली नाही. देशासाठी मोहिमेवर गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर सरकारने एक पैसाही खर्च केला नाही. सारे काही कागदोपत्रीच राहिले. परमेश्वराच्या कृपेने मी परत आलो. पण, आजही तेथील कारागृहात अनेक भारतीय कैदी आहेत. त्यातील काही सरकारचे हेर आणि सैनिकही असतील. त्यांच्या कुटुंबीयांची येथील सरकारने दखल घ्यायला हवी.
माझ्याकडून सत्य वदवून घेण्याचा पाकिस्तानी प्रशासनाने बराच प्रयत्न केला. पण, त्यांना माझ्याकडून कोणतीही माहिती शेवटपर्यंत मिळू दिली नाही. मला त्यावेळी या कामाकरिता भारत सरकारने ४०० रुपये पगारावर पाठविले होते. मी देशासाठी जे करायचे ते इमानाने केले.
तुमच्यासारखेच अन्य काही लोक तेथे कार्यरत आहेत का, असे विचारले असता काश्मीर सिंग म्हणाले की, मी हेर म्हणून गेलो होते आणि मी माझे काम केले. बाकीच्यांविषयी मी काहीही बोलणार नाही. अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास मी बांधील नाही.
पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान त्यांना सात वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मी पाकिस्तानी कारागृहातील माझ्या वास्तव्याबद्दल काहीच विस्ताराने सांगू शकत नाही. फक्त एकच सांगू शकतो की, मी देवावर विश्वास ठेवणारा आहे. पाकिस्तानी कारागृहात मी नमाज अदा करीत होतो आणि रोजेही ठेवत होतो. पाकिस्तानी कारागृहात मला "इब्राहिम' नावाने ओळखले जायचे. १७ वर्षेपर्यंत मला साखळीने बांधून ठेवण्यात आले होते.
यावेळी बोलताना परमजीत कौर यांनी काश्मीर सिंग यांच्या अनुपस्थितीत मुलांना वाढविण्यासाठी घरोघरी काम केल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, माझ्या पतीला अटक झाल्यानंतर केंद्र सरकारने आमच्या कुटुंबाला कोणतीही मदत दिली नाही. आम्हाला अक्षरश: वाऱ्यावर सोडले. मुलांचे पोट भरण्यासाठी मला घरोघरी मोलकरणीचे काम करावे लागले.

No comments: