Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 3 March, 2008

------------------
अबू सालेम आणि मी
न्यायालयात मी प्रवेश केल्यानंतर समोर न्यायाधीश बसलेले असताना प्रख्यात गुन्हेगार अबू सालेम मला उभा राहून नमस्कार करतो, तो मी त्याच्यापेक्षा मोठा डॉन आहे म्हणून नाही, तर त्याच्या मनात कायद्याची भिती निर्माण झाली आहे म्हणून.
---------------------------------------
--------------------
माफीचे अर्ज
फाशीच्या शिक्षेला माफी देण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती आणि राज्यपालांना आहे. आज फक्त अफझलच्या फाशीबद्दल बोलले जाते. फाशीची शिक्षा झालेल्यांचे अनेक दयेचे अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित आहेत. हे अर्ज लवकरात निकालात काढणे गरजेचे आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते अर्ज निकालात न आल्यास अर्ज ग्राह्य धरला जाऊ नये. यावर विचार झाला पाहिजे.
----------------------------
संघटित गुन्हेगारीविरुद्ध लढा आवश्यक ः निकम
पणजी, दि. 2 (प्रतिनिधी) ः कायदा कमकुवत नाही, तर कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. कायदा हा बंदुकीच्या "बूलेट' प्रमाणे आहे. हा कायदा एखाद्या "बुलेट' प्रमाणे गुन्हेगाराच्या शरीरात घुसून त्याला घायाळ करीत नाही, तोपर्यंत कायद्याला कोणीही घाबरणार नाही. संघटित गुन्हेगारांविरुद्ध लढणे ही काळाची गरज आहे. तसेच लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निर्भीड पत्रकारिता करणे ही समाजाच्या आरोग्यासाठी आणि न्यायालयालाही दक्ष ठेवण्यास महत्त्वाची असल्याचे मत मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते आज पणजीत बोलत होते.
मुंबई बॉम्बस्फोट खटला सुरू असताना आलेल्या अनुभवाविषयी काही प्रश्न विचारले असता,"मला अनेक धमक्या आल्या. परंतु त्या मी सार्वजनिक ठिकाणी कधीही सांगत नाही. कारण मला अकारण सहानुभूती मिळवायची नाही. गुन्हेगारांविषयी बोलणे हा माझ्या व्यवसायातील स्थायी भाव आहे. त्यामुळे त्याचे भांडवल करणे योग्य नाही. या खटल्यातील 608 जणांना जन्मठेप आणि 27 आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर मला अनेक लोकांची पत्रे आली. माझे मुंबईत घर नसून मी एका हॉटेलमध्ये राहतो. आजही दर दिवसाला 25 ते 30 पत्रे येतात. लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आणि सहानुभूतीमुळे हा खटला यशस्वी झाला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात संघटित गुन्हेगारी वाढत आहे. याची कारणे अनेक आहेत. गुन्हेगाराला जात, धर्म आणि पंथ नसतो. न्यायालय त्याचे समाजातील स्थानही लक्षात घेत नाही. "गुन्हेगाराला शिक्षा होते, तेव्हा मला आनंद होत नाही, तर एखाद्याला न्याय मिळाला म्हणून मी खूष होतो' असे ते म्हणाले. न्यायालय गुन्हेगाराला शिक्षा उगाच देत नाही. त्याच्या मागे दोन उद्देश असतात, एक त्याला त्या गुन्ह्याविषयी शिक्षा आणि दुसरा, त्या प्रकारचा अन्य कोणी गुन्हा करण्यास धजू नये.
वृत्तपत्र हा एक व्यवसाय झाला आहे. परंतु पत्रकारिता हा धर्म असून त्याचा व्यवसाय होता कामा नये, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार, वकील आणि शासन यांच्यात पारदर्शकता असली पाहिजे. पत्रकारांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. गंभीर गुन्ह्यात पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. सरकारी वकील आणि पत्रकार यांच्या विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे. मुंबई बॉम्बस्फोट खटला चालवताना मी पहिल्यांदा मुंबईत आलो, त्यावेळी माझ्या काही व्यवसायातील मित्रांनी मला पत्रकारांपासून लांब थांबण्याचा सल्ला दिला. परंतु या खटल्यात मला पत्रकारांचा भरपूर उपयोग झाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. स्वतःचा विचार स्वच्छ असला म्हणजे प्रसिद्धी माध्यमाकडे बोलायला कोणताही धोका नसतो, असे सांगून ज्या ठिकाणी वकील किंवा न्यायव्यवस्था बोलू शकत नाही, त्या ठिकाणी पत्रकार बोलू शकतो, असे ते म्हणाले.
खटल्याविषयीच्या बातम्या वृत्तपत्रांत आल्या, म्हणजे तो गुन्हा शाबीत होतो असे नाही. परंतु ते वृत्त प्रसिद्ध करताना न्यायालयाचा अवमान होत नाही ना, याची खात्री केली पाहिजे. न्यायालयाविषयी काही लिहू नये, ही भिती पत्रकारांनी काढून टाकली पाहिजे. न्यायालयाचा कारभारसुद्धा पारदर्शक असला पाहिजे. न्यायालये जर कुठे चुकत असतील तर तेही दाखवून दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
प्रमोद महाजन खून प्रकरणात पोलिसांच्या अनेक त्रुटी राहिल्या होत्या, असे सांगून ते म्हणाले की, पोलिस कायद्याचे पूर्ण प्रशिक्षण घेऊन तपास काम करीत नाहीत. पोलिस तपासात अनेक त्रुटी राहत असल्यानेच अट्टल गुन्हेगार सुटतात. हा प्रकार अत्यंत घातक असतो. आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी कायद्याच्या कागदपत्रांत काय ऊहापोह केला पाहिजे, याचे शिक्षण पोलिसांना दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
पत्रकार आणि पोलिस यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पोलिसांनी आणि पत्रकारांनी चांगली साथ दिल्याचे सांगून पत्रकार हा कोणाचाही दोस्त आणि शत्रू नसतो, याचा अनुभव या खटल्यावेळी आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांविरोधात बोलायला साक्षीदार घाबरतात. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणे गरजेचे असते. त्या साक्षीदारांच्या साक्षी गुप्तपणे घेतल्या पाहिजेत. तसेच त्यांचे नाव व पत्ता गुप्त ठेवला पाहिजे. विदेशात गुन्हेगाराने पोलिसांसमोर दिलेली गुन्ह्यांविषयीची कबुली न्यायालयात ग्राह्य धरली जाते. परंतु भारतात पोलिसांसमोर गुन्हेगाराने दिलेली जबानी न्यायालयात ग्राह्य धरली जात नसल्याचे ते म्हणाले.
चांगला वकील हा सरकारी वकील होण्यासाठी वळत नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, वकिली व्यवसायात अनेक जण ना खुषीनेच येत असतात. लग्नाच्या बाजारात वकिली व्यवसायाचे "मार्केट डाऊन' आहे, असे ते मिस्कीलपणे म्हणाले.

No comments: