Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 7 September 2009

स्वाईन फ्लूचा पहिला गोमंतकीय बळी

मडगावातील खाजगी इस्पितळात खोलाच्या तरुणीचा मृत्यू
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - "स्वाईन फ्ल्यू'ची लागण झालेल्या २८ वर्षीय तरुणीचे मडगाव येथील एका खाजगी इस्पितळात उपचार घेताना निधन झाले. गेल्या १२ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिच्याकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आज सकाळी १० वाजता तिचा मृत्यू झाल्याची माहिती "स्वाईन फ्ल्यू'विषयक नोडल अधिकारी डॉ. जुझे डिसा यांनी दिली. त्यामुळे सदर तरुणी "स्वाईन फ्ल्यू'ची गोव्यातील पहिली बळी ठरली आहे.
यंदाच्या २५ ऑगस्ट रोजी मडगावातील एका खाजगी इस्पितळात या तरुणीला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी दिल्ली येथे पाठवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात तिला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणी सिद्ध झाल्यानंतर तिला "टॅमीफ्ल्यू' या औषधांचा दुप्पट डोसही देण्यात आला होता. मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे डॉ. डिसा यांनी सांगितले.
मूळ खोला काणकोण येथील सदर तरुणी मडगावात आपल्या नातेवाइकांकडे राहात होती. विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिला या रोगाची लागण झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मडगाव येथे ती ज्याठिकाणी राहत होती तेथील सर्वांच्या लाळेचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वी गोव्यात उपचार घेत असलेल्या दोन व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने निधन झाले होते. मात्र संबंधित व्यक्ती शेजारील कर्नाटक राज्यातील होत्या. त्यामुळे आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांनी केंद्रीय आरोग्य खात्याला पत्र पाठवून याची नोंद गोव्याच्या नावे करू नये, अशी विनंती केली आहे. कारण या दोन्ही व्यक्तींना या रोगाची लागण गोव्याबाहेर झाली होती. त्या केवळ उपचार घेण्यासाठीच गोव्यात आल्या होत्या.
गोव्यात स्वाईन फ्लूचे २३८ संशयित रुग्ण असून ३१ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यातील अनेकांची प्रकृतीही स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.
खोला भागावर भीतीची छाया
आगोंद (वार्ताहर) ः खोला पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या तरुणीचे स्वाईन फ्ल्युमूळे निधन झाल्याची वार्ता पसरताच स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून तिला या रोगाने ग्रासले होते. आज सकाळी तिचा दुर्दैवी अंत झाला. उद्या दि. ७ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सदर तरुणीला या रोगाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर आरोग्य खात्याने अद्याप याठिकाणी खबरदारी म्हणून कोणतेच उपाय केले नाहीत. तसेच औषधांचा साठाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. खोला पंचायत क्षेत्रात स्वाईन फ्ल्यूविषयी कोणतीही जाहिरात सरकारने केलेली नाही. टीव्हीवरून थोडी फार माहिती मिळाली आहे, असे या भागातील एका व्यक्तीने सांगितले. सरकारच्या या निष्क्रीयतेबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

वादग्रस्त"रिवा रिसॉर्ट'चे कुंपण उद्या पाडणार

मांद्रेच्या खास ग्रामसभेत
पंचायत बरखास्तीची
ग्रामस्थांची मागणी

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी) - मांद्रे पंचायतीच्या खास ग्रामसभेत आज ग्रामस्थांनी पंचायत मंडळ बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत असल्याचा आरोप करून पंचायत मंडळाला चांगलेच फैलावर घेतले. जुनसवाडा येथील तथाकथित "रिवा रिसॉर्ट'च्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात पंचायतीला अपयश आल्याने पंचायत मंडळ तात्काळ बरखास्त करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यासमोर नमते घेत "रिवा रिसॉर्ट'चे बेकायदा कुंपण मंगळवार ८ रोजी मोडून टाकण्यात येईल ,असे स्पष्टीकरण देत सरपंच महेश कोनाडकर यांनी ग्रामस्थांना शांत केले. हे आश्वासन पूर्ण न झाल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा इशारा देत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाची झोपच उडवली.
मांद्रे जुनासवाडा येथील "सीआरझेड' चे उघडपणे उल्लंघन करून थेट किनाऱ्यावरच उभारलेल्या रिवा रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर चर्चा करण्यासाठी ही खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती. "सीआरझेड' संबंधी उच्च न्यायालयाने पंचायतींना कारवाई करण्याचे आदेश दिले असताना बड्या बांधकामांना मात्र पंचायतीकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जुनसवाडा येथील रिवा रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीररीत्या सुरू असताना पंचायतीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यावरून या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून ग्रामस्थांनी पंचायत मंडळच बरखास्त करण्याची मागणी केली. या बांधकामावर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवल्याने पंचायत मंडळाचे धाबेच दणाणले. सरपंच महेेश कोनाडकर यांनी यावेळी ग्रामस्थांना १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे १८ रोजी सदर बांधकामाचा पंचनामा केला व लगेच पुढची नोटीस जारी करून सदर बांधकामाचे मालक भरत नाईक यांना बेकायदेशीर बांधकामाबाबत स्पष्टीकरण देण्यास चौदा दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले. भरत नाईक यांनी सदर नोटिशीस अतिरिक्त पंचायत संचालकांकडे "आव्हान' दिले असून ती सुनावणी येत्या १० रोजी होणार आहे, त्यामुळे पंचायत काहीही करू शकत नाही असा पवित्रा घेतला. मुळातच या बांधकामाबाबत पंचायतीकडून कारवाई करण्यास विलंब का झाला,असा आरोप करून यावेळी ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
आजच्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी पंचायत कायद्याचा योग्य अभ्यास पंचायत मंडळाला चांगलेच कैचीत पकडले. ही ग्रामसभा "पाच मिनिटांत' गुंडाळण्याचा डाव आखलेल्या पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी सुमारे साडेतीन तास वेठीस धरून आज ग्रामसभेतील ग्रामस्थांनी खरी भूमिका काय असते हे पटवून दिले. पंचायतीच्या आदेशाला आव्हान दिले म्हणून पंचायतीला कारवाई करण्यापासून कुणी रोखले असा सवाल करून केशव मांद्रेकर यांनी पंचायत मंडळ याप्रकरणी लोकांचा डोळ्यांत धूळ फेकत असल्याचे सांगितले. या बांधकामप्रकरणी घोटाळा झाला असून पंचायतीच्या सर्व सदस्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरी जावे,अशी मागणी त्यांनी केली व या मागणीचे उपस्थित सर्व नागरिकांनी जोरदार समर्थन केले. विद्यमान पंचायत मंडळ सुशिक्षित आहे त्यामुळे ते गावचे हित जपेल अशी लोकांची समजूत होती पण या पंचायत मंडळाने मात्र लोकांची घोर निराशा केल्याची टीका जयवंत हणजूणकर यांनी केली. पंचायत सचिव श्री.नाईक यांच्याकडून पंचायत मंडळाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.शेवटी शिवकुमार आरोलकर यांनी पंचायत कायदा कलम २००(१)अंतर्गत पंचायत मंडळ आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवून हे पंचायत मंडळ बरखास्त करावे,असा ठराव सादर केले व पंचायत मंडळ सदस्यांचे धाबेच दणाणले. शेवटी येत्या ८ रोजी या बांधकामावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर अखेर हा ठराव मागे घेण्यात आला. हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर पंचायतीला उच्च न्यायालयात खेचून अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या सभेत सुभाष आसोलकर,महेश मांद्रेकर,शिवकुमार आरोलकर,सुरेश सावंत,ऍड.प्रसाद शहापूरकर, शंकर गोवेकर, निलेश मांद्रेकर आदी युवकांनी भाग घेतला व पंचायत कायद्याचा आधार घेऊन पंचायत मंडळाला फैलावर घेतले.

पणजीत कचऱ्याचे ढीग; सर्वत्र जीवघेणी दुर्गंधी

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - राजधानी पणजीत पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागले असून कुजलेल्या कचऱ्याच्या असह्य दुर्गंधीमुळे लोकांना तोंडावर रुमाल ठेवल्याशिवाय शहरात फिरणेही अशक्य बनले आहे. केवळ बाजारातील ओला कचरा सोडल्यास अन्य ठिकाणचा कचरा शहरात तसाच पडून आहे. गेल्या दोन दिवसांपासून पणजी महापालिकेने कचरा उचलला नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.
गोवा विद्यापीठ परिसरात यापूर्वी टाकण्यात येणारा कचरा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद करावा लागल्याने पुन्हा ही समस्या उद्भवल्याचे सूत्रांनी सांगितले. कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी पणजी महापालिकेकडे जागा नसल्याने हा कचरा टाकावा तरी कुठे या विवंचनेत पालिका अधिकारी आहेत. दोन दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणचा कचरा उचलला गेला नसल्याने आणि गेल्या गेले दोन दिवशी सतत पडलेल्या पावसामुळे हा कचरा कुजला आहे. त्याला भयंकर दुर्गंधी सुटली आहे. तसेच त्या कचऱ्यातून घाण पाणी रस्त्यातून वाहात असून त्यातूनच लोकांना जावे लागत आहे.
या कचरा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तपदी संजीत रॉड्रिक्स यांना खास नियुक्त करण्यात आले होते. तथापि, दोन महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आली. शहरात साचत असलेल्या या कचऱ्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वाईन फ्ल्यूशी लढा देताना त्यात या कचऱ्यामुळे मलेरिया तसेच अन्य साथीच्या रोगाने डोके वर काढल्यास लोकांना जगणेही कठीण होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया काही दुकानदारांनी व्यक्त केल्या. तसेच भाजप नगरसेवकांनी, शहरात साचलेला कचरा त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.
यासंबंधी महापौर कॅरोलिना पो यांच्याशी वारंवार संपर्क साधला तरी त्या फोनवर उपलब्ध झाल्या नाहीत.

पंचायत कायदा दुरुस्तीला करमणे ग्रामसभेतही विरोध

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी) : करमणेच्या आज झालेल्या ग्रामसभेत सरकारच्या पंचायत कायदा दुरुस्तीस तीव्र विरोध दर्शवण्यात आला व यासंदर्भात दक्षिण गोवा सरपंच मंचाने घेतलेल्या धोरणाला पाठिंबा दर्शवण्यात आला.
सरपंच एस्कॉर्टियू डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. तीत ग्रामस्थांनी पंचायत कायदा दुरुस्तीद्वारे सरपंचांकडील अधिकार काढून घेऊन ते सरकारनियुक्त पंचायत सचिवाकडे देणे म्हणजे एकप्रकारे लोकप्रतिनिधींचा उपमर्द असल्याचे सांगण्यात आले आणि सरकारचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
काहींनी तर सरकारने बिल्डरांच्या दडपणाला बळी पडून मेगा प्रकल्प उभारू देण्यासाठीच ही दुरुस्ती झाल्याचा आरोप केला. काही ग्रामसभांत लोकांच्या संतापाचा भडका उडाला. त्यानंतर सरपंचांनी घेतलेली भूमिका बिल्डरांना त्रासदायक ठरू लागली व त्यांनी पंचायत सचिवांकडे अशा निर्णयांची कार्यवाही करण्याचे अधिकार देणारी दुरुस्ती संमत करवली असे प्रतिपादण्यात आले.
दक्षिण गोव्यात सरसकट सर्वच भागांतून या पंचायत कायदा दुरुस्तीविरोधात जनजागृती होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सासष्टीतील सर्वच पंचायतींनी या दुरुस्तीस विरोेधदर्शवला असून त्यामध्ये बऱ्याच कॉंग्रेस समर्थक पंचायतींचाही समावेश आहे.

मडगाव रेल स्थानकावर बॉंबच्या फोनने धावपळ

मडगाव दि. ६ (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असलेल्या मडगाव रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याचा फोन आज सकाळी ८ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला आला व सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. नंतर सरकारी यंत्रणांची विलक्षण धावपळ उडाली आणि त्यात ओखा-अर्नाकूलम या गाडी सुमारे सव्वा तास रखडली.
अखेर बॉंबची ती अफवाच असल्याचा निष्कर्ष जेव्हा काढण्यात आला गेला तेव्हा सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला.
रेल्वे स्टेशनवरील फलाट क्र. २ वर हा बॉंब ठेवल्याचा फोन आला तेव्हा त्या फलाटावर ओखा- अर्नाकुलम ही गाडी येत होती. फोन येताच सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात आला. आपत्कालीन स्थिती घोषित झाली. फलाटावरील सर्व दुकाने लगेच बंद झाली. प्रवासी डब्यातच बसून देवाचे नाव घेऊ लागले.
लगेच मडगाव पोलिस व रेल्वे पोलिसांनी या फलाटाला गराडा घातला. पणजीहून बॉंब विल्हेवाट पथक तसेच श्र्वानपथक पाचारण करून फलाटाची व रेल्वे गाडीची तपासणी करण्यात आली. तेथे अंतिमतः काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ती अफवा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र, दरम्यानचा दीड तास प्रचंड मानसिक तणावाखाली गेला. नंतर ओखा एक्सप्रेस आस्ते आस्ते अर्नाकुलमच्या दिशेने रवाना झाली.

Sunday, 6 September 2009

पावसाची वाटचाल शंभरीकडे
राज्यात पावसाची शतकाकडे घोडदौड सुरू असून आत्तापर्यंत एकूण ९७ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. गेल्या चोवीस तासांत एकूण ३ इंच पाऊस पडला. आणखी किमान दोन दिवस असाच पाऊस सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हे त्यामागील मुख्य कारण आहे.

राज्यात तुफानी पावसाचे दोन बळी
जनजीवन विस्कळित
वाहतुकीचे तीनतेरा
अंजुणे धरणाचे
चारही दरवाजे खुले
फोंड्यात मंदिरामध्ये
पाणी घुसले
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर आजही कायम राहिल्याने राज्यभरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सांगे भागातील रिवण येथे इशांत सूरज रिवणकर हा साडेतीन वर्षांच्या मुलगा काल ओहळाच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊन मरण पावला; तसेच फोंडा तालुक्यातील बांदिवडे येथे एकजण वाहून गेला. त्याचा शोध सुरू असून त्याचे नाव समजलेले नाही. अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे डिचोली व साखळी भागावर पुराचे संकट ओढवण्याची शक्यता वाढली आहे. बाकीच्या ठिकाणी जीवितहानीची नोंद नसली तरी विविध ठिकाणी झाडांची पडझड होऊन वाहतुकीचा खोळंबा उडण्याबरोबरच अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळण्याचेही प्रकार घडले.
अंजूणे धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचा चौथा दरवाजाही आज उघडण्यात आला. डिचोली व साखळी भागावर पुराचे संकट ओढवण्याची शक्यता वाढल्याने आपत्कालीन यंत्रणा याठिकाणी पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे.आज दिवसभरात पडलेल्या पावसामुळे पणजी शहर पूर्णपणे पाण्याने भरले होते.जिथेतिथे रस्त्यावर पाणी भरल्याने पादचारी व वाहन चालकांना बरीच कसरत करावी लागली.चिंचोळे येथे एका घरावर माड पडल्याने सुमारे पाच हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.आजदिवस भरात अग्निशमन दलाशी अनेकांनी संपर्क साधल्याने दिवसभरात खात्याचे जवान मदतकार्यात व्यस्त होते.
सांग्यात लहानग्याचा बुडून मृत्यू
सांगे प्रतिनिधी ः रिवण सांगे येथे श्री विमलेश्वर मंदिरासमोर राहणाऱ्या सूरज रिवणकर यांच्या घरासमोरून एक ओहोळ वाहतो. संततधार पावसामुळे सध्या ओहोळाची पातळी बरीच वाढलेली आहे. शुक्रवार ४ रोजी मुसळधार पाऊस पडत असल्याने सूरज यांनी आपल्या दोन्ही मुलांना इशांत (४) व शुभम (५) यांना बालवाडीमध्ये न पाठविण्यास आपल्या पत्नीला सांगितले व ते कामावर निघून गेले. दुपारी बाराच्या सुमारास या दोघांनीही आपणास शौचाला जायचे आहे, असे आईला सांगितले. त्यानंतर ते घराबाहेर पडले. काही वेळाने शुभम घरी आला व इशांत दिसत नसल्याने आईने बाहेर जाऊन त्याची शोधा-शोध सुरू केली. शेजाऱ्यांकडे विचारपूस करूनही तो सापडला नाही. त्यामुळे वडिलांना पाचारण करण्यात आले. वडिलांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ओहोळात शोधाशोध सुरू केली व अखेर दीड कि.मी. अंतरावर कुशावती नदीच्या संगमावर भोवऱ्यात अडकलेल्या इशांतचा पार्थिव मिळाले.
रिवण पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. नंतर दुपारी शोकाकूल वातावरणात रिवण येथे इशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना हुंदका आवरला नाही. आपल्या कोवळ्या मुलांच्या निधाने रिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली त्या भागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
क्रीडानगरीसाठी आता
सोमवारी फेरसर्वेक्षण
गैरहजर राहण्यावर
शेतकरी बांधव ठाम

पेडणे, दि. ५ (प्रतिनिधी) - धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून शेतजमीन वगळावी या मागणीशी ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर नमते घेऊन स्थगित ठेवण्यात आलेले फेरसर्व्हेक्षण आता सोमवार ७ रोजी पुन्हा हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्थेच्या नावाने अटक करण्याची पोलिसांकरवी धमकी देणे व दुसरीकडे त्यांना फेरसर्वेक्षणाला सहयोग करण्याचे आवाहन करणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात फेरसर्व्हेक्षणाच्या जागी हजर न राहण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला आहे.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा २०११ आयोजित करण्यासाठी नियोजन आयोगाकडून ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी या कामाला चालना देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, क्रीडानगरीसाठी जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना फेरसर्वेक्षणाच्या निमित्ताने पोलिसांकरवी नोटिसा पाठवण्यात आल्याने त्या मागे घेईपर्यंत या फेरसर्वेक्षणाला हजर न राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेऊन सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
धारगळ येथील या नियोजित क्रीडानगरी जागेतील शेतकऱ्यांनी फेरसर्वेक्षणाला उपस्थित राहून आपाल्या जागेत कोणत्या प्रकारची किती झाडे आहेत, हे अधिकाऱ्यांना दाखवावे, जेणेकरुन आणखी बागायतीची व शेतजमीन वगळण्यास मदत होईल, असे आवाहन क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांनी केले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हाती घेण्यात आलेल्या फेरसर्वेक्षणावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई व कुटुंबीयांच्या ४ लाख चौरस मीटर जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
पेडणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा पाठिंबा मिळत नसेल तर इथल्या प्रमुख समस्या सोडवणे अशक्य आहे. शेतकऱ्यांच्या बागायती व शेतजमिनी कमी प्रमाणात का होईना या प्रकल्पासाठी जाणार याबद्दल आपल्याला दुःख वाटते. तथापि, शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी व शासकीय नोकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर म्हणाले.
शेतकरी ठाम
पेडणे तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांची येथील शेतकरीही कदर करतात. पेडणे तालुक्याचा विकास व्हावा याबाबत कुणाचेच दुमत नाही व क्रीडानगरीलाही तालुक्यातून कुणाचाही विरोध नाही. प्रश्न केवळ एवढाच आहे की या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी आवश्यक खडकाळ व नापीक जागा पेडणे तालुक्यात इतरत्र भरपूर आहे; पण क्रीडामंत्र्यांकडून केवळ याच जागेचा हट्ट नेमका का धरला जातो आहे याबाबत मात्र ते काहीही बोलत नाहीत. ही जागा नियोजित विमानतळ व रेल्वेस्थानकापासूनही जवळ आहे. अशीच जागा तुये येथेही आहे व हा गाव देखील मोपा व रेल्वेस्थानकापासून जवळ आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर नमते घेत क्रीडामंत्र्यांकडून जागा कमी करण्याचे सत्र सुरूच आहे.आता एवढेच असेल तर पेडण्यात नापीक जमीन संपादन करून हा पूर्ण प्रकल्प उभारणे शक्य आहे, त्याचा विचार ते का करीत नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
"रिवा रिसॉटर्र्' बांधकामावरून
मांद्रे खास ग्रामसभा गाजणार
पंचायत बरखास्तीची आज
मागणी होण्याची शक्यता

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - मांद्रे जुनसवाडा येथे स्थानिक पंचायतीच्या आशीर्वादाने किनाऱ्यावर बेकायदा उभारलेल्या "रिवा रिसॉर्ट' बांधकामाचा विषय उद्या ६ रोजी होणाऱ्या खास ग्रामसभेत गाजण्याची शक्यता आहे. गेल्या १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर याविषयी खास ग्रामसभा बोलावण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने हा विषय उद्याच्या ग्रामसभेच चर्चेला येणार आहे.
मांद्रे जुनसवाडा येथे भर किनाऱ्याला टेकून "सीआरझेड' कायद्याचे उल्लंघन करून "रिवा रिसॉटर्र्'या बड्या हॉटेल प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थानिक पारंपरिक मच्छीमार तथा इतर लोकांना "सीआरझेड'उल्लंघनाच्या नोटिसा पाठवणाऱ्या मांद्रे पंचायतीकडून या वादग्रस्त बांधकामाला मात्र संरक्षण देण्यात येत होते. पंचायतीच्या एकूण दहा सदस्यांपैकी एकही सदस्य या बांधकामाबाबत चकार शब्दही काढायला तयार नसल्याने याप्रकरणी मोठा व्यवहार झाल्याचा संशय या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.याबाबत दै."गोवादूत' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल स्थानिक आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतली व हा विषय गेल्या विधानसभा अधिवेशनात शून्य प्रहराला उपस्थित केला.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तात्काळ या बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व दुसऱ्याच दिवशी हे बांधकाम पेडण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी पोलिसांच्या मदतीने बंद पाडले. गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे या बांधकाम मालकाला नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत खात्याला काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे संपूर्ण बांधकाम विकासबाह्य क्षेत्रात येते; त्यामुळे त्याचे संरक्षण करणे शक्य नाही,असे मत किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यक्त केले आहे.
दरम्यान, याबांधकाम प्रकरणी पेडणे तालुक्यातील एका सत्ताधारी नेत्याकडून या बांधकाम मालकांना संरक्षण देण्याची हमी देण्यात आल्याची जोरदार चर्चा या गावात सुरू आहे.सध्या कारवाईच्या नावाने केवळ धूळफेक सुरू आहे व हे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याची टीका येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पंचायत मंडळाला जाब विचारण्याची तयारी त्यांनी ठेवली असून उद्याच्या ग्रामसभेत पंचायत मंडळाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
किनारी भागातील या जागेत पूर्वापारपासून तीन गरीब कुळांची घरे आहेत. या कुटुंबीयांना इतरत्र हलवून त्यांच्या घरांचा क्रमांक वापरून हे नवे बांधकाम कायदेशीर करण्याची शक्कलही लढवली जात असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी किनारी भागातील बेकायदा हॉटेल व इतर बड्या बांधकामांना संरक्षण मिळणार नाही, असे सरळ स्पष्ट केले आहे. इथे मात्र स्थानिक पंचायत अशा बांधकामांना आश्रय देत आहे, असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अखेर शिक्षक यादी बासनात!
शिक्षक दिनीच उमेदवारांची घोर निराशा

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - गोवा लोकसेवा आयोगाने पात्रतेच्या आधारावर नेमलेल्या एकूण ५२ सरकारी उच्च माध्यमिक शिक्षक व भागशिक्षणाधिकाऱ्यांची यादी जवळजवळ रद्दबातल ठरवण्याचीच तयारी सरकारने केली आहे. निवड होऊन गेले तीन महिने नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शिक्षकांनी आज शिक्षकदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेला प्रतिसाद पाहता या शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. या निवड यादीत पात्र उमेदवारांची निवड झाली नाही, असे अप्रत्यक्षपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने लोकसेवा आयोगाच्या प्रदीर्घ निवड प्रक्रियेला सामोरे जाऊन आयोगाच्या पात्रतेस योग्य ठरलेल्या या ५२ शिक्षकांची क्रूर चेष्टाच सुरू आहे.
आज या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कामत यांची कला अकादमी येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले. दरम्यान, काही पत्रकारांनी मुख्यमंत्री कामत यांना याप्रश्नी विचारले असता त्यांनी या यादीबाबत विचार करावा लागेल, असे सांगितले. या निवड यादीत समावेश न झालेल्या उमेदवारांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे निवेदनही आपल्याकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. आता दोन्ही बाजूचे म्हणणे एकूण घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. एक उमेदवार "पीएचडी' झालेला असूनही त्याची या यादीत निवड झाली नाही, असे सांगून त्यांनी या यादीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
दरम्यान, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मात्र या यादीबाबत काहीही आक्षेप नाही हे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अंतिमतः ही यादी स्वीकारची की नाही हे मुख्यमंत्री कामत यांच्या हाती आहे. सरकारातील एका बड्या नेत्याने शिफारस केलेल्या उमेदवाराचा समावेश या यादीत नाही, त्यामुळेच या नेत्याने मुख्यमंत्री कामत यांच्यावर दबाव टाकून ही यादी रद्द करण्याचा डाव आखला आहे,अशी चर्चा सरकारी गोटात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी ही यादी स्वीकारल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, इथपर्यंत हे प्रकरण गेले आहे. दरम्यान, ही यादी रद्द करण्याच्या हेतूने निमित्त तयार करण्यासाठी या यादीत अधिकतर भाजप समर्थक उमेदवारांचा समावेश आहे,अशी तक्रार युवक कॉंग्रेस व प्रदेश कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे केंद्रीय प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे केली आणि त्यांनी ही यादी स्थगित ठेवण्याचे आदेश दिल्याचीही चर्चा कॉंग्रेस गोटात सुरू आहे.
सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप या धोरणानुसारच आता ही यादी तयार करण्याचा सरकारचा डाव आहे. ही यादी रद्द झाल्यास सरकारने स्थापन केलेल्या आयोगाची विश्वासार्हताच लोप पावणार आहे. या यादीला विरोध करून विद्यमान सरकारकडून पात्र उमेदवारांची उपेक्षा व फजिती सुरू आहे, अशी टीकाही करण्यात येत आहे.
राज्य शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण
देश महासत्ता होण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज - कामत

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - आपल्या देशाला महासत्ता बनवण्याकामी शिक्षणाचे योगदान महत्त्वाचे आहे व त्याकरता दर्जेदार शिक्षण मुलांना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले. शिक्षकदिनानिमित्त येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
व्यासपीठावर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, शिक्षण संचालिकाडॉ.सेल्सा पिंटो, शिक्षण सचिव डॉ. एम. मुदास्सीर व पुरस्कारप्राप्त शिक्षक हजर होते. मुख्यमंत्री कामत यांच्या हस्ते सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसबिरीला हार अर्पण करण्यात आला. समई प्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या शिक्षकांत आसरा नाईक(सरकारी प्राथमिक विद्यालय चिंचोळे पणजी), लुईझिना एम. डिकॉस्ता द वाझ (प्राथमिक शिक्षक, अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूल, कुडतरी- सासष्टी), सतीश म्हापसेकर(साहाय्यक शिक्षक, प्रोग्रेस हायस्कूल, पणजी), विठोबा देसाई (साहाय्यक शिक्षक,व्ही.जी.एस.विद्यालय, रावणफोंड-नावेली सासष्टी), उल्हास व्ही. पै भाटीकर(मुख्याध्यापक, सरकारी माध्यमिक विद्यालय, सादोळशे-काणकोण) व आयडा बोर्जिस (प्रथम श्रेणी शिक्षक, सरकारी मल्टिपर्पज उच्च माध्यमिक, बोर्डा मडगाव) यांचा समावेश होता.
त्याखेरीज कमाल निधी जमा केल्याबद्दल वास्को,डिचोली व तिसवाडी तालुक्यांचा गौरव करण्यात आला. सासष्टी तालुक्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या आदर्श शिक्षकांची दखल सरकारने घेणे क्रमप्राप्त आहे. देशाचा विकास साधायचा असेल व देशाला गरिबीपासून मुक्त बनवायचे असेल तर शिक्षणाचे मोल महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिक्षण तळागाळात पोहचले आहे खरे; पण शिक्षणाचा दर्जा उचांवला आहे काय, असा सवालही मुख्यमंत्री कामत यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल व नवे तंत्रज्ञान याबाबत शिक्षकांना अवगत करण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन व्हावे. सरकारने शिक्षकांना लॅपटॉपसाठी व्याजमुक्त कर्ज योजनेचाही शुभारंभ केला आहे, त्याचा फायदा नक्कीच त्यांच्या अध्यापनात होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे सकारात्मक आहेत, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन कोणतेही प्रस्ताव त्यांच्याकडे नेऊ नका,असा सल्लाही मुख्यमंत्री कामत यांनी दिला.
मोन्सेरात म्हणाले, राज्यातील भावी पिढीची धुरा सांभाळणाऱ्या शिक्षकांना सरकारचे संपूर्ण सहकार्य लाभेल. शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.व्याजमुक्त लॅपटॉप कर्ज योजना, निवृत्ती वयात वाढ आदी मागण्याही पूर्ण करण्यात आल्या. कुडका येथील शिक्षक महासंकुलाची योजना लवकरच कार्यन्वित केली जाईल. या जागेचा विकास करण्यासाठी धेंपो व अल्कॉन समूह यांनी स्वखर्चाने ५ कोटी उभारून या जागेचा विकास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्यावसायिक व संगणक शिक्षकांना नियमित वेतन लागू करून सेवेत नियमित करण्याच्या आश्वासनाशी सरकार बांधील असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. राज्यातील एकशिक्षकी शाळेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अतिरिक्त दोन शिक्षकांनी नेमणूक करण्यात येईल. तसेच पूर्ण प्राथमिक शिक्षकांनाही नियमित शिक्षकांची वेतनश्रेणी लागू केली जाईल, असेही आश्वासन मोन्सेरात यांनी दिले.
डॉ. सेल्सा पिंटो यांनी स्वागत केले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या कारकिर्दीचा आलेख सर्वांसमोर ठेवला व ते या पुरस्कारास कसे पात्र ठरले हे त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. संतोष आमोणकर यांनी आभार मानले. चारुशीला देसाई यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत रंगत वाढली. याप्रसंगी दीनानाथ मंगेशकर सभागृह खचाखच भरले होते.