काणकोण, दि. ३० (प्रतिनिधी): भाजप सरकार सत्तेवर आल्यास ‘उटा’च्या बहुतेक मागण्या मान्य केल्या जातील व त्यामुळे या समाजाला आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. आज खोतीगाव पंचायतीच्या मैदानावर आदर्श युवा संघ आयोजित अनुसूचित जमात अन्याय निषेध सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, सरपंच तेजस्विनी दैयकर, ऍड. बाबुसो गावकर, माजी सरपंच विशांत गावकर, पंच उमेश वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते.
आत्तापर्यंत अनुसूचित जमातींसाठी २५०० नोकर्या द्यायच्या राहून गेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेल्या अकराशे नोकर्या, तसेच आरोग्य खात्यातील ४१६ जागांपैकी बहुतेक जागा अनुसूचित जमातींतील उमेदवारांतूनच भरल्या जाव्यात. आदिवासासींना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी भाजप न्यायालयीन लढाई पुकारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अनिर्बंध खाण व्यवसायामुळे आदिवासींच्या मुलांवर मोठे संकट कोसळणार आहे. असे सांगतानाच सध्याचे शैक्षणिक धोरण जर असेच राहिले तर ‘गाकुवेध’ समाजाची मुले शिक्षणात मागे राहतील असेही पर्रीकर म्हणाले.
उमेश गावकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. विजय पै खोत, रमेश तवडकर आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली. संजय तवडकर यांनी आभार मानले. या सभेला सुमारे एक हजार आदिवासी बांधवांची उपस्थिती लाभली होती.
Sunday 31 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपली प्रतिक्रिया:
Post a Comment