Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 September, 2010

अयोध्या प्रकरणाचा निकाल २४ तारखेलाच

लखनौ, दि. १७ - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी दिल्या जाणाऱ्या प्रस्तावित निकालाला पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता हा निकाल कोणत्याही सामोपचाराच्या चर्चेविना २४ तारखेलाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दोन याचिका उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर दाखल झाल्या होत्या. एका याचिकेत रमेशचंद्र त्रिपाठी यांनी राष्ट्रकुल स्पर्धा असल्याने अयोध्येबाबतचा २४ सप्टेंबर रोजी येणारा निकाल पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी केली होती. या निर्णयामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकले पण, याचिका दाखल करून न घेता फेटाळून लावली. तसेच सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी त्रिपाठी यांनी अशी फालतू याचिका दाखल केल्याचा आरोप ठेवीत न्यायालयाने त्रिपाठी यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्याचे संकेत दिले. त्याविषयीचा निर्णय मात्र आज दिला नाही. न्या. एस.यू.खान, न्या. सुधीर अग्रवाल आणि न्या. धर्मवीर शर्मा यांच्या न्यायासनाने हा निकाल दिला.
निर्मोही आखाड्याची याचिका
निर्मोही आखाड्याने आज एक याचिका नव्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर सादर केली. कोर्टाबाहेर सामोपचाराने, चर्चेच्या माध्यमातून अयोध्या प्रश्न सोडविण्यासाठी आखाड्याचे महंत राजा रामचंद्र यांनी १० दिवसांची मुदत मागितली होती. किमान २७ सप्टेंबरपर्यंत तरी हा निकाल लांबणीवर टाकावा, अशी आखाड्याची मागणी होती. ऍड. आर.एल.वर्मा यांनी आखाड्याच्या वतीने ही याचिका दाखल केली. या चर्चेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मध्यस्थ म्हणून बसविण्याचेही आखाड्याने याचिकेत म्हटले आहे. पण, आता या ६० वर्षे जुन्या प्रश्नाला चर्चेने सोडविण्यासाठी फारसा वाव उरलेला नाही, असे सांगून न्यायालयाने निकाल लांबणीवर टाकण्यास नकार दिला.
कोर्टाबाहेर समझोता नाही
अयोध्या प्रकरणी कोर्टाबाहेर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण, आज दोन्ही पक्षांनी यासाठी नकार दिल्याने सामोपचाराने मार्ग निघण्याची शक्यता मावळली.
या प्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभा आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने कोर्टाबाहेर हा मुद्दा सोडविण्यास आज नकार दिला. त्यामुळे आता यातून सामोपचाराने मार्ग निघू शकत नाही, असे स्पष्ट झाले आहे.

No comments: